सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : नाना पाटेकरांवर पुण्यातील डोणजे गावात आजच अंत्यसंस्कार, लाडक्या नटसम्राटाला शासकीय इतमामात निरोप!
  • नाना पाटेकरांचा निधनाच्या ४८ तास आधीचा VIDEO व्हायरल; मुलांसोबत रमले, तबला वाजवला अन् कुणालाही कल्पना नव्हती...
  • ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन; मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा
 DIGITAL PUNE NEWS

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन; मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा

डिजिटल पुणे    08-10-2026 08:22:29

गोवा : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पाउला येथील त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या अस्सल अभिनयशैलीने, प्रभावी संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेला दिलेल्या वेगळ्या छटेमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य गाजवले. अभिनेता म्हणून त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारत भारतीय चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर सामाजिक भान जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख होती. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि गरजूंसाठी त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी मदतीचे विविध उपक्रम राबवले. त्यामुळे त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या सामाजिक कार्याचीही व्यापक चर्चा झाली.

नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीत त्यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रातही योगदान दिले. ‘प्रहार’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ यांसह अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या प्रभावी अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह विविध मान-सन्मानांनी गौरवण्यात आले होते.

अभिनयातील ताकद, स्पष्टवक्तेपणा, सामाजिक बांधिलकी आणि सामान्य माणसाशी जोडलेली नाळ यामुळे नाना पाटेकर हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व बनले होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू कलाकार गमावला असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती