पुणे : मानदुखीपासून आराम मिळावा म्हणून मानेखाली इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग ठेवून झोपलेल्या एका आयटी अभियंत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरात उघडकीस आली आहे. रोहन कुबडी (वय ३०) असे मृत अभियंत्याचे नाव असून, तो सोमनाथनगर परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. झोपेत असताना इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅगमधून विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दुर्गंधी येऊ लागल्यानंतर उघडकीस आली घटना
रोहन हा आयटी क्षेत्रात अभियंता म्हणून कार्यरत होता. तो सुमारे तीन महिन्यांपूर्वीच सोमनाथनगर येथील भाड्याच्या सदनिकेत राहायला आला होता. तो एकटाच राहत असल्याने त्याच्या दैनंदिन हालचालींबाबत इतरांना फारशी माहिती नव्हती. दरम्यान, त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही फोनला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातच फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने घरमालकाला संशय आला.त्यानंतर घरमालकाने फ्लॅटचा दरवाजा उघडून पाहिले असता रोहन बिछान्यावर मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह सुमारे दोन दिवस फ्लॅटमध्येच पडून असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तरुण अभियंत्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मानेखाली इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग; पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता रोहनच्या मानेखाली इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित उपकरणातून विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅगमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता का, उपकरणाचा वापर करताना काही त्रुटी राहिल्या होत्या का किंवा मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि संबंधित उपकरणाच्या तांत्रिक तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. चंदननगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग वापरताना काळजी घेणे आवश्यक
मानदुखी, कंबरदुखी किंवा शरीराच्या अन्य भागांतील वेदना कमी करण्यासाठी अनेक जण गरम पाण्याची पिशवी किंवा इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅगचा वापर करतात. कमी वेळेत उष्णता मिळत असल्याने अशा उपकरणांचा वापर वाढत आहे. मात्र, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
विशेषतः इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग वापरताना उत्पादकाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. उपकरण चार्ज होत असताना त्याचा वापर टाळावा, खराब वायर किंवा सदोष उपकरण वापरू नये आणि ते शरीराखाली किंवा मानेसारख्या संवेदनशील भागाखाली ठेवून झोपू नये. उपकरणात असामान्य उष्णता, गळती किंवा इतर बिघाड जाणवल्यास त्याचा वापर त्वरित थांबवावा.
पुण्यातील या घटनेत इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅगमुळेच मृत्यू झाला, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष न करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.