सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का?
  • दिल्ली पोलिसांनी पकडताच अभिजीत दिपकेंनी लपवलेला पत्ता बाहेर काढला, म्हणाले, आमच्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करेल, त्याचं ऐका!
  • अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
  • अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड झालं, पण दिल्ली पोलीस डायरेक्ट विमानात घुसले अन्... दिपके पोलिसांच्या ताब्यात
 जिल्हा

बनावट नोंदणीप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून कठोर कारवाई

डिजिटल पुणे    10-10-2026 15:32:10

मुंबई : परदेशी वैद्यकीय पदवीधरांच्या (एफएमजी) नोंदणीमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) ऑनलाइन नोंदणी पोर्टलमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परिषदेने तातडीने दखल घेतली असून, महाराष्ट्र सायबरमार्फत सखोल तपास सुरू आहे. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची भूमिका परिषदेने स्पष्ट केली आहे.

परिषदेच्या अंतर्गत तपासणी आणि नोंदणी अभिलेखांच्या छाननीदरम्यान ही अनियमितता उघडकीस आली. प्राथमिक चौकशीत २२ संशयित परदेशी वैद्यकीय पदवीधर आढळून आले. यानंतर ऑनलाइन नोंदणी प्रणालीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. तसेच संबंधित व्यक्तींना मूळ कागदपत्रांसह पडताळणीसाठी परिषदेसमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी परिषदेने १४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र सायबरकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून, पुढील तपास सुरू आहे. या तपासात परिषद संबंधित यंत्रणेला पूर्ण सहकार्य करीत आहे.

वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता, कायदेशीरता आणि वैद्यकीय नोंदणीची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी परिषद कटिबद्ध आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी मिळविणे किंवा ऑनलाइन प्रणालीमध्ये छेडछाड करणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रुग्णांचे संरक्षण आणि राज्यात केवळ पात्र व पडताळणी केलेले डॉक्टरच वैद्यकीय व्यवसाय करतात, याची खात्री करणे हा वैद्यकीय नोंदणीचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या नोंदणीची खात्री महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून करावी आणि संशयास्पद माहिती आढळल्यास ती परिषदेला कळवावी, असे आवाहन परिषेदमार्फत करण्यात आले आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती