मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून, राज्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.आरोग्य योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत किती प्रमाणात पोहोचतो, आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि रुग्णसेवेत कोणत्या अडचणी येतात, याचा यात्रेत आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. आरोग्य उपकेंद्रांपासून जिल्हा, महानगरपालिका, मनोरुग्ण आणि विशेष रुग्णालयांपर्यंतच्या सेवांचाही आढावा घेतला जाणार आहे.
लोकसहभाग वाढविण्यासाठी जिल्हा, तालुका, महापालिका आणि ग्रामपातळीवरील आरोग्य समित्यांच्या बैठका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहेत. या बैठकांमध्ये आवश्यक सुविधा, मनुष्यबळ, औषधांचा पुरवठा, रुग्णसेवेतील अडचणी आणि योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींबाबत सूचना मागविण्यात येणार आहेत.महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, मोफत डायलिसिस, एमआरआय व सीटी स्कॅन, स्टेमी उपचार, टेलिमेडिसिन, मोफत रक्त तपासण्या, १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवा, जननी सुरक्षा योजना, माहेरघर आणि मानसिक आरोग्य समुपदेशन यांसारख्या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. संबंधित अधिकारी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन पात्र रुग्णांना उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाशी या यात्रेची सांगड घालून सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांमध्ये ग्रामपातळीवरील सहभाग वाढविण्यावरही भर राहणार आहे.
जनतेच्या सूचनांवरून आरोग्य सेवेत सुधारणा
आरोग्य संवाद यात्रा ही केवळ आरोग्य योजनांची माहिती देणारी मोहीम नसून, नागरिकांच्या अनुभवातून आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य समित्या, लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात समन्वय वाढवून आरोग्य सेवांबाबत उत्तरदायित्व मजबूत करण्यावर भर राहणार आहे.नागरिकांच्या गरजा समजून घेणे, आरोग्य सेवांमधील त्रुटी ओळखणे आणि प्राप्त सूचनांच्या आधारे सुधारणा घडवून आणणे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी आरोग्य संवाद यात्रा राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या यात्रेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि विविध आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत. यात्रेत मिळालेल्या सूचना व अभिप्रायांचा आढावा घेण्यासाठी ५ डिसेंबरनंतर राज्यस्तरीय बैठक होणार असून, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत राज्यस्तरीय आरोग्य समिती सदस्यांची बैठक घेण्याचेही नियोजन आहे.