सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
  • 'सोमेश्वर'च्या मतमोजणीत पहिला निकाल सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या बाजूने; संग्राम सोरटे 57 मतांनी विजयी, समर्थकांचा जल्लोष
  • मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
  • एसटीच्या खरेदीत गैरव्यवहार! बाजारभावापेक्षा 30 टक्के अधिक दराने साहित्य खरेदी; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्री अन् परिवहन मंत्र्यांना पत्र धाडलं
  • विराटला निवृत्तीसाठी भाग पाडलं... अजित आगरकरांवर गंभीर आरोप, माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ
 शहर

नवले पुल परिसरातील संभाजी महाराज चौकात सीसीटीव्ही खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

गजानन मेनकुदळे    12-10-2026 11:29:06

नऱ्हे : नऱ्हेगावातून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील आशीर्वाद हॉटेलसमोरील छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्व्हिस रोडच्या कडेला असलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा जुना खांब कोसळल्याची घटना काल रात्री घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याची माहिती आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खांब यापूर्वीच वाकलेल्या अवस्थेत होता. काल रात्री एखाद्या अज्ञात वाहनाची धडक बसल्यामुळे किंवा खांब कमकुवत झाल्यामुळे तो कोसळला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या खांबावर जुने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. हे कॅमेरे बंद अवस्थेत असावेत, असेही स्थानिकांकडून सांगण्यात आले.

नऱ्हेगाव, नवले पूल आणि परिसरातील इतर भागांना जोडणाऱ्या या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विशेषतः छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर हा अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या वाकलेल्या खांबांसह इतर धोकादायक संरचनांची वेळीच दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

खांब कोसळण्याच्या घटनेत कोणतीही हानी झाली नसली, तरी अशी घटना गर्दीच्या वेळी घडली असती तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने घटनास्थळाची पाहणी करून कोसळलेल्या खांबाबाबत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे की नाही, याची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली, तरी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित प्रशासनाने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.


 Give Feedback



 जाहिराती