सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
  • 'सोमेश्वर'च्या मतमोजणीत पहिला निकाल सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या बाजूने; संग्राम सोरटे 57 मतांनी विजयी, समर्थकांचा जल्लोष
  • मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
  • एसटीच्या खरेदीत गैरव्यवहार! बाजारभावापेक्षा 30 टक्के अधिक दराने साहित्य खरेदी; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्री अन् परिवहन मंत्र्यांना पत्र धाडलं
  • विराटला निवृत्तीसाठी भाग पाडलं... अजित आगरकरांवर गंभीर आरोप, माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ
 शहर

आविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत: कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

डिजिटल पुणे    12-10-2026 14:43:30

पुणे : विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होत त्याचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भर देण्यात आलेला असून 'आज काय आहे' आणि 'उद्या काय हवंय' हे सूत्र लक्षात ठेवून संशोधन विकसित करणे आवश्यक आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सर्वोत्तम सोई - सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून 'आविष्कार' स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विजिगीषू वृत्तीत वाढ होत त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये आयोजित झोनल लेवल 'आविष्कार' स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व विद्यापीठ आविष्कार स्पर्धा समन्वयक डॉ. देविदास वायदंडे, प्राचार्या डॉ. संगीता जगताप, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. पंडित शेळके, आविष्कार स्पर्धा जिल्हा समन्वयक डॉ. शुभांगी शिंदे, उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, समन्वयक डॉ. सुभाष वाव्हळ, अविष्कार संशोधन समिती समन्वयक डॉ. राणी भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांनी सदर स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आभार व्यक्त करत स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अविरत परिश्रम करणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी आविष्कार ही फक्त एक स्पर्धा नसून उद्याचे भविष्य असल्याचे नमूद करत चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तयार होत असल्याकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर विद्यापीठ आविष्कार स्पर्धा समन्वयक डॉ. देविदास वायदंडे यांनी आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून सुमारे ४८०० पेक्षा जास्त संशोधन प्रकल्प सादर झाले असल्याचे नमूद करत भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या स्पर्धेद्वारे जागतिक दर्जाच्या संशोधनाच्या संधीचे द्वार उघडण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे सांगितले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. विनायक जोशी यांनी विशेष भेट देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

सदर स्पर्धेमध्ये मानव्यविद्या व भाषा, वाणिज्य - व्यवस्थापन व विधी, कृषी व पशुपालन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि मूलभूत विज्ञान या विषयांमध्ये पुणे व पिंपरी - चिंचवडमधील ५० पेक्षा जास्त महाविद्यालयातील ४८० विद्यार्थ्यांनी २४० संशोधन प्रकल्प सादर करत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले असून या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक डॉ. सुभाष वाव्हळ, सूत्रसंचालन डॉ. मेधा मिसार तर आभार प्रदर्शन डॉ.राणी भगत यांनी केले असून प्रणित पावले, वीरेन चव्हाण यांनी विशेष तांत्रिक सहकार्य केले.


 Give Feedback



 जाहिराती