कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलीस हवालदार स्मिता सचिन माने (वय ३८) यांचा मृतदेह बिडवाडी हुंबरणे येथील जंगल परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास ही घटना आली. या घटनेमुळे पोलीस दलासह परिसरात खळबळ उडाली आहे.
स्मिता माने या कणकवली पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती सचिन माने हे देखील पोलीस दलात कार्यरत आहेत. नुकतीच या दाम्पत्याची बदली वैभववाडी पोलीस ठाण्यात झाली होती. बदलीच्या पार्श्वभूमीवर दोघांनी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी किरकोळ रजा घेतली होती. हे कुटुंब कलमठ येथील नाडकर्णीनगर परिसरात वास्तव्यास होते.
मुलाला शाळेत सोडल्यानंतर झाल्या बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबरच्या रात्री स्मिता माने आणि त्यांचे पती सचिन यांनी घरातील साहित्याची आवराआवर केली होती. दुसऱ्या दिवशी, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी स्मिता यांनी आपल्या मुलाला शाळेत जाण्यासाठी तयार केले. त्यानंतर सकाळी सुमारे ७.४५ वाजता रिक्षाने त्या मुलाला वरवडे येथील खासगी शाळेत सोडण्यासाठी गेल्या.
मात्र, मुलाला शाळेत सोडल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. सकाळी उठल्यानंतर सचिन माने यांना स्मिता घरी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी मुलाच्या शाळेत जाऊनही चौकशी केली. त्यावेळी मुलगा सार्थक शाळेत असल्याचे समजले; मात्र स्मिता यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
पतीने दिली बेपत्ता झाल्याची तक्रार
स्मिता यांचा शोध घेऊनही त्या सापडत नसल्याने त्यांचे पती सचिन माने यांनी १० ऑक्टोबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत अपहरणाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासादरम्यान स्मिता यांनी आपला मोबाईल फोन घरीच ठेवल्याचे समोर आले.
दरम्यान, सोमवारी दुपारी बिडवाडी हुंबरणे येथील जंगलात एका महिलेचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा मृतदेह बेपत्ता असलेल्या स्मिता माने यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
प्राथमिक तपासात महत्त्वाची माहिती समोर
प्राथमिक तपासानुसार, मुलाला शाळेत सोडल्यानंतर स्मिता माने या त्याच रिक्षाने बिडवाडी हुंबरणे परिसरात गेल्या असाव्यात. त्यानंतर त्या जंगलाच्या दिशेने गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या संपूर्ण घटनाक्रमाबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माहेरच्या कुटुंबीयांकडून सखोल तपासाची मागणी
स्मिता माने यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे माहेरचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. संबंधित व्यक्ती पोलीस खात्यातील असली तरी तिला पाठीशी घालू नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. स्मिता माने यांनी कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील पोलीस तपासातून या प्रकरणातील अधिक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.महिला पोलीस हवालदाराच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.