सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना धक्का; उमेदवारी अर्ज अवैध, शक्तिप्रदर्शन करत दाखल केला होता अर्ज
  • धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
  • नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
 राज्य

जनगणना-२०२७ चा दुसरा टप्पा-लोकसंख्या गणनेसाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

डिजिटल पुणे    13-10-2026 11:30:28

मुंबई : जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या कामाचे प्रभावी नियोजन करण्यासाठी राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच जनगणनेच्या वेळापत्रकानुसार या कामाचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली. बैठकीस समन्वय समिती सदस्य तथा शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका तथा केंद्र शासनाच्या सहसचिव डॉ. निरुपमा जे. डांगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले, राज्यात जनगणना-२०२७ चा पहिला टप्पा म्हणजेच घरयादी व घरगणना मे-जून, २०२६ दरम्यान यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण, प्रगणक व पर्यवेक्षकांच्या समयोचित नियुक्त्या, प्रशिक्षणाची पुढील प्रक्रिया, स्व-गणना आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचे नियोजन करण्यात येत आहे. हे सर्व उपक्रम मार्च, २०२७ पर्यंत राज्यभर राबविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपापल्या कार्ययोजना जनगणनेच्या वेळापत्रकाशी सुसंगत ठेवून कामाचा वेग कायम राखावा, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.

दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी गृह रक्षक दल, वन विभाग, जिल्हा परिषद आणि शिक्षकांसह अन्य पात्र कर्मचाऱ्यांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयांनी नियुक्तीसाठी पात्र अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची यादी तयार करून संबंधित जनगणना चार्ज अधिकाऱ्यांकडे (तहसीलदार /मुख्याधिकारी / वॉर्ड अधिकारी) उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही मुख्य सचिव अग्रवाल यांनी दिल्या.

मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले, भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयाने १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अधिसूचनेद्वारे जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यात विचारण्यात येणाऱ्या ४० प्रश्नांची यादी अधिसूचित करण्यात आली आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात ३ सप्टेंबर २०२६ रोजी पुनर्प्रकाशित करण्यात आली आहे. जनगणनेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी राज्यामध्ये स्थानिक पातळीवरील जनजागृती आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःची आणि कुटुंबाची स्व-गणना करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आवाहन करण्यात येणार आहे.बैठकीत जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका तथा केंद्र शासनाच्या सहसचिव डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा, महत्त्वाचे निष्कर्ष आणि दुसऱ्या टप्प्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीच्या नियोजनाची माहिती समितीस दिली.


 Give Feedback



 जाहिराती