पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने मुळशी तालुक्यातील ताम्हिणी गाव येथे श्रमदानातून वनराई बंधारे बांधले. महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. वनराई बंधाऱ्यामुळे जनावरे, पशु-पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी मदत होणार आहे.जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनासाठी युवा' या ब्रीद वाक्याप्रमाणे स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी गाव शिवारात दोन ठिकाणी दगड, माती, रिकाम्या सिमेंट पिशव्यांच्या साहाय्याने कमीत कमी खर्चात वन बंधारा उभारून जल व्यवस्थापन काय असते, याचे महत्व येथील शेतकरी व ग्रामस्थांना पटवून दिले. या वन बंधाऱ्यातून पाणी टंचाईवर मात होऊन जवळपास हजारो लिटर पाणीसाठा शिल्लक राहील, असे काम स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी केले आहे.
श्रमदानासाठी महाविद्यालयाचे चाळीस स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाले होते त्याचबरोबर ताम्हिणी गावचे सरपंच स्वाती निकेश चोरगे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सपकाळ, दत्ता मराठे, नंदू बामगुडे, सविता बहिरट, ग्रामसेवक मधुकर कांबळे, गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.उपक्रमाचे आयोजन प्राचार्य तथा सहाय्यक अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष मोरे, डॉ. अशोक शेळके, प्रा. रचना कोळपे प्रा. अभिजीत शिंदे, प्रा.निकिता कदमबांडे यांनी केले.