पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात मद्यप्राशन करून भरधाव कार चालविल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एमआयटी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर एका कारने तीन ते चार दुचाकींना धडक दिली. या अपघातात तीन ते चार दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेनंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी कारचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी २४ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. संबंधित तरुण मद्यप्राशन करून वाहन चालवत होता का, याची तपासणी केली जात आहे.
भरधाव कारची दुचाकींना धडक
मिळालेल्या माहितीनुसार, पौड रस्त्यावरून कोथरूड डेपोकडे जाणारी कार एमआयटी महाविद्यालयासमोरील रस्त्यावरून वेगाने जात होती. यावेळी कारने रस्त्यावरून जाणाऱ्या तीन ते चार दुचाकींना धडक दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली.
अपघातानंतर नागरिकांनी कार थांबवून चालकाला बाहेर काढले. त्यानंतर संतप्त जमावाने त्याला मारहाण केली आणि पोलिसांच्या हवाली केले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
एमआयटीमध्ये शिकणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला २४ वर्षीय तरुण एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत असून, तो सिंहगड रस्ता परिसरात राहतो. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणाने मद्यप्राशन करून कार चालविल्याचा संशय आहे.
या प्रकरणी तरुणाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अद्याप कोणाकडूनही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास आणि वैद्यकीय तपासणीच्या निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मद्यधुंद वाहनचालकांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
कोथरूड परिसरात वाहतूक कोंडी आणि पदपथांच्या अभावामुळे पादचारी तसेच वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात मद्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहन चालविण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मद्यधुंद वाहनचालकांमुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.