पुणे : श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, शिरगाव यांच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी श्री साईबाबा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून सकाळी ९ वाजता पालखीचे प्रस्थान होणार असून, शहरातील प्रमुख मार्गांवरून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता रासणे मंदिर, तोफखाना येथे साईबाबांच्या पादुकांच्या महाअभिषेकाने होईल. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाअभिषेक व महाआरती झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालखीचे प्रस्थान होणार आहे.
पालखी मिरवणूक बेलबाग चौक, लक्ष्मी रोड, शनिपार चौक, अलका टॉकीज, संभाजी पूल, फर्ग्युसन रोड, ज्ञानेश्वर पादुका चौक, वडारवाडी, ओम सुपर मार्केट आणि सिंबायोसिस कॉलेज परिसरातून मार्गक्रमण करणार आहे. या मार्गावरील साईभक्तांना पालखीचे दर्शन घेता येणार आहे.
सिंबायोसिस कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार,सौ स्वाती मुजुमदार व परिवार यांच्या हस्ते दुपारी १ वाजता मध्यान आरती होणार असून, दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील कार्यक्रमानंतर पालखी शिरगावच्या दिशेने प्रस्थान करेल. तेथे सायंकाळी पालखीचे स्वागत, धूप आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी शिरगाव येथे विजयादशमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता महाअभिषेक, मध्यान आरती, भजन सेवा, सायंकाळी ६.१५ वाजता धूप आरती आणि सायंकाळी ६.४५ ते ७.३० या वेळेत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.
पुण्यातून निघणाऱ्या या पालखी सोहळ्यात साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन साईबाबांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चे कार्यकारी विश्वस्त सौ विभावरी देवळे जाधव व तहहयात विश्वस्त श्री रवी जाधव यांनी केले