सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या
  • रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
  • अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या
 शहर

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही वाचनाला पर्याय नाही! डॉ. सुशील धसकटे; ‘आजच्या काळात महात्मा फुले वाचताना’ विषयावर विचारप्रवर्तक मार्गदर्शन

डिजिटल पुणे    17-10-2026 11:49:50

सांगवी : माहितीचा विस्फोट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभाव असलेल्या आजच्या युगातही वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगभरातील संशोधन आणि शोधांचा पाया वाचनात आहे. माहिती मिळविण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेता येते; मात्र ज्ञान, विवेक, चिकित्सक दृष्टी आणि जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कादंबरीकार डॉ. सुशील धसकटे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी येथील मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि प्रेरणादायी विचारवंत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या एकदिवसीय व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे, कवी डॉ. स्वप्नील चौधरी आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय सहायक सागर शंकर उपस्थित होते.

महात्मा फुलेंच्या विचारांतून वर्तमानाची उत्तरे शोधा!

‘आजच्या काळात महात्मा फुले वाचताना’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. धसकटे म्हणाले की, महात्मा फुले यांच्या विचारांचा केंद्रबिंदू सत्य हा होता. सत्याच्या पायावर उभ्या असलेल्या त्यांच्या विचारविश्वातूनच सार्वजनिक सत्यधर्माची संकल्पना आकाराला आली. महात्मा फुले यांचे लेखन आजच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय प्रश्नांच्या संदर्भातही तितकेच महत्त्वाचे आहे.

‘शेतकऱ्यांचा असूड’ आणि ‘तृतीय रत्न’ यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, स्त्रीजीवन, सामाजिक विषमता आणि निसर्गाशी संबंधित प्रश्नांचे चिकित्सक विश्लेषण केले. आज हे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. आपल्या सामाजिक-सांस्कृतिक मुळांपासून दूर जाण्याच्या काळात महात्मा फुले यांचे साहित्य आपल्याला आत्मपरीक्षणाची आणि परिवर्तनाची दिशा देते. म्हणूनच महात्मा फुले यांना केवळ जयंती-पुण्यतिथीपुरते स्मरण न करता त्यांचे विचार समजून घेणे आणि आचरणात आणणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले हे केवळ विचारवंत नव्हते, तर ते कृतिशील समाजसुधारकही होते. त्यांच्या कार्याचे विविध पैलू समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्यासह महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची चरित्रे आवर्जून वाचावीत, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी महात्मा फुले यांच्या अखंडातील प्रार्थनेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

‘वाचाल तर फुलाल’; वाचनातूनच विचारांची समृद्धी!

‘वाचाल तर फुलाल’ या विषयावर बोलताना कवी डॉ. स्वप्नील चौधरी यांनी वाचनाच्या बदलत्या स्वरूपाकडे लक्ष वेधले. वाचन कमी झाले असे म्हणण्यापेक्षा वाचनाची माध्यमे बदलली आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. वाचनाची सुरुवात कदाचित कठीण वाटेल; मात्र त्यातून मिळणारी बौद्धिक समृद्धी आयुष्यभर उपयोगी पडते, असे त्यांनी सांगितले.

वाचनामुळे माणूस विचार करायला शिकतो, स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करू शकतो आणि प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्याची क्षमता विकसित करतो. चॅटजीपीटी आणि गुगलसारखी साधने माहिती उपलब्ध करून देऊ शकतात; परंतु त्या माहितीचे आकलन, मूल्यमापन आणि विवेकपूर्ण उपयोग करण्यासाठी स्वतःच्या वाचनातून विकसित झालेली विचारशक्ती आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी. ही मैत्री जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देईल, असे त्यांनी नमूद केले.

विनोद, उपरोध आणि उपहास यांची प्रभावी सांगड घालत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘ओठ’, ‘निसर्ग’, ‘कर्जबाजारीपणाची व्यथा’, ‘लढणारा गण्या’ आणि ‘चल गड्या, दंगल समजून घेऊ’ या कवितांच्या सादरीकरणातून त्यांनी उपस्थितांना हसवतानाच अंतर्मुख केले. त्यांच्या कवितांनी हास्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक वास्तवाची जाणीव करून दिली आणि अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

मराठी विश्वकोश : ज्ञानाचा समृद्ध स्रोत

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय सहायक सागर शंकर यांनी मराठी विश्वकोशाचे स्वरूप, त्याचा अभ्यास करण्याची पद्धत आणि दैनंदिन जीवनातील त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ज्ञानाच्या विविध शाखांतील माहिती मराठीतून मिळवून देणारा विश्वकोश हा विद्यार्थ्यांसाठी आणि जिज्ञासू वाचकांसाठी उपयुक्त ज्ञानस्रोत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माणसांनाही वाचा आणि वाचन आचरणात आणा!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी विभागप्रमुख डॉ. विजय बालघरे यांनी पुस्तकांच्या वाचनाबरोबरच माणसे वाचण्याचे महत्त्व अधोरेखित केले. वाचनातून मिळालेले ज्ञान केवळ शब्दांपुरते मर्यादित न राहता ते आपल्या विचारांत, व्यवहारात आणि आचरणात उतरले पाहिजे. वाचन माणसाला समृद्ध करते; तर त्या वाचनातून मिळालेल्या मूल्यांचे आचरण माणसाला अधिक संवेदनशील आणि विवेकी बनवते, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. संगीता जगताप यांनी थोर व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीत वाचन आणि विचार यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी दररोज आवर्जून वाचन करावे आणि ज्ञानाच्या या सवयीला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती; उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. कु. अंजली तोगरे हिने ‘मोगरा फुलला’ ही रचना सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय ग्रंथपाल कॅप्टन डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. मनीषा खैरे आणि प्रा. शर्मिला देवकाते यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. नूतन लोणकर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे आणि सहायक सचिव, वाई येथील श्री. ललित दे. कुडमथे यांनी विशेष सहकार्य केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख आणि सहसचिव (प्रशासन) एल. एम. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानमालेतून तंत्रज्ञानाच्या वेगवान युगातही पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित झाले. माहितीच्या गर्दीतून ज्ञानाकडे, ज्ञानातून विवेकाकडे आणि विवेकातून मूल्याधिष्ठित जीवनाकडे जाण्याचा मार्ग वाचनातूनच प्रशस्त होतो, हा विचार या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.


 Give Feedback



 जाहिराती