सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
  • टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड! सूरत एक्स्प्रेसमधून संशयित ताब्यात, राजस्थानमध्येही पोलिसांची कारवाई
 शहर

'कोकणचा शाश्वत विकास ' विषयावरिल चर्चासत्रास चांगला प्रतिसाद; एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन आणि बॅ.नाथ पै सेवांगण कडून आयोजन

डिजिटल पुणे    19-10-2026 11:26:12

पुणे/मालवण: एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन(पुणे )आणि बॅ.नाथ पै सेवांगण(मालवण ) यांच्या वतीने  'कोकणचा शाश्वत विकास' यावर चर्चासत्राचे रविवारी ,१८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते. साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे चर्चासत्र झाले.चर्चासत्रात डॉ. केतन चौधरी, सुजय मोरे, संजय मं.गो.डॉ. सुमेधा नाईक आणि व्ही. के. सावंत यांनी विविध विषयाची मांडणी केली. चर्चेत प्रा. प्रवीण बांदेकर, अभिजीत हेगशेट्ये, अॅड. देवदत्त परुळेकर, मल्हार इंदुलकर, डॉ. ज्योती बुवा तोरसकर, अॅड. संदीप निंबाळकर, डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. मनीषा गुप्ते, एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे, युसुत्सू आर्ते, डॉ. मंगलताई देडगे आदी सहभागी झाले होते. सुमारे १५० हून अधिक  पर्यावरणप्रेमी, कार्यकर्ते,प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला.

चर्चासत्राची भूमिका एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष साथी सुभाष वारे यांनी मांडली. कोकणचा निसर्ग, जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करताना विकासाची नेमकी दिशा कोणती असावी, यावर व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी  चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सर्व चर्चासत्रांच्या शेवटी चर्चा, प्रश्नोत्तरे झाली.

 यावेळी नागेश कदम, उपेंद्र टण्णू राहुल भोसले, शैलेश खांडाळेकर, संजय वराडकर, नितीन वाळके, जाधव सर, मेगल डिसोझा, पत्रकार महेंद्र पराडकर, नाना मानकर, रमेश अवस्थी, वेंगुर्ले येथील गटशिक्षणाधिकारी अजय ढाले, मंगलताई परुळेकर, जगदीश नलावडे, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, अर्पिता मुंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मत्स्य साठ्याची विध्वंसक पद्धतीने होणारी हानी थांबवणे !

पहिल्या सत्रात मत्स्य दुष्काळ आणि मच्छीमारांचे प्रश्न यावर चर्चा करण्यात आली. डॉ. चौधरी म्हणाले, कोकणातील मत्स्य व्यवसाय किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असून मत्स्य उत्पादनाची शाश्वत मासेमारी निर्माण करणे आवश्यक आहे. जबाबदारीने मासेमारी करणे प्रत्येक मासेमारांनी आपले कर्तव्य म्हणून पाहिले पाहिजे. स्फोटकांचा वापर, विषप्रयोग तसेच इतर हानिकारक गोष्टीचा वापर करून मासेमारी करणे थांबविले पाहिजे. व्यावसायिक मासेमारीसाठी एलईडी दिव्यांचा वापर पूर्णतः बंद करून मत्स्यसाठ्याचे विध्वंसक पद्धतीने होणारी हानी थांबविली गेली पाहिजे. नौकांच्या वाढलेल्या संख्येमुळे मत्स्य साठे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात काढले जात आहेत व त्यामुळे आर्थिक नुकसान त्यांना सहन करावा लागत आहे. मासेमारीवरील ताण कमी करणे क्रमप्राप्त आहे.

हापूस आंब्यामध्ये सक्षम जात विकसित व्हावी - व्ही. के. सावंत

तिसरे सत्र आंबा-काजू उत्पादन आणि भविष्यातील दिशा यावर झाले. यामध्ये व्ही. के. सावंत म्हणाले, हापूस आंब्याची व्हरायटी यावर अधिक संशोधन होण्याची आणि हापूसमधील उत्तम गुणधर्म असणारी आणि हापूस सारखेच इतर गुणधर्म म्हणजेच उत्तम किपिंग क्वॉलिटी आणि रंग, मार्केटमधील मागणीच्या बाबतीत संशोधन होण्याची गरज आहे. हापूस आंब्यामध्ये सघन लागवड तंत्रज्ञान विकसित करायला हवे. नैसर्गिक बदलांसाठी सक्षम जात विकसित व्हायला हवी. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञानसुद्धा विकसित करणे गरजेचे आहे. अतिउच्च तापमानाची आगाऊ कल्पना आल्यास, त्यात काही उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदत झाली पाहिजे. आंबा विशेष लागवड घेऊन SEZ निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे इंट्रा स्ट्रक्चर डेव्हलप करणे सोपे जाईल. मोनो कल्चरचे दुष्परिणाम टाळण्यासाठी इतर झाडांची २० टक्के लागवड होणे गरजेचे आहे. आंबा बागायतदारांसाठी मोठ्या प्रमाणावर ज्या निविष्ठा लागतात, त्यांची सामुदयिक खरेदी आणि व्यवस्था शासनांतर्गत होण्याची गरज आहे.यातील नफेखोरी शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे, असे सांगितले.

उपाययोजना व धोरणात्मक दिशावर मंथन

कोकणचे निसर्गसौंदर्य आणि येथील नैसर्गिक संसाधने पर्यटकांसह विविध उद्योगांना नेहमीच आकर्षित करत आली आहेत. मात्र, कोकणात येणारे उद्योग आणि पर्यटकांचा वाढता ओघ हा या प्रदेशाच्या विकासासाठी कितपत फायदेशीर आहे, त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम कोणते असू शकतात, याबाबत सातत्याने चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर कोकणची जैवविविधता कायम राखून येथील विकासाला योग्य दिशा देण्याची गरज अधोरेखित होत आहे. कोकणात नेमके कोणते उद्योग असावेत, शाश्वत पर्यटनाची संकल्पना प्रत्यक्षात कशी राबवता येईल, मत्स्य व्यवसायासमोरील संकटे आणि मत्स्य दुष्काळाची समस्या कशी दूर करता येईल, आंबा-काजूफळबागायतदारांच्या अडचणी कोणत्या आहेत, अशा महत्वपूर्ण मुद्यांवर विचारमंथन झाले. पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिक जनतेच्या आर्थिक प्रगतीचा समतोल साधण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना व धोरणात्मक दिशा निश्चित करण्याच्यादृष्टीने हे चर्चासत्र महत्वपूर्ण ठरले.

निसर्गासाठी संरक्षण निर्माण करणारे पर्यटन आवश्यक - डॉ. सुमेधा नाईक

दुसरे चर्चासत्र शाश्वत पर्यटन यावर झाले. यात डॉ. सुमेधा नाईक, मल्हार इंदुलकर, प्रसाद गावडे यांनी सहभाग घेतला. प्रसाद गावडे यांनी राखणदार यावर भाष्य केले. सत्र प्रमुख म्हणून बोलताना डॉ. सुमेधा नाईक म्हणाल्या, पर्यटकांसाठी अनुभव निर्माण करणारे, स्थानिकांसाठी उत्पन्न निर्माण करणारे आणि कोकणच्या निसर्गासाठी संरक्षण निर्माण करणारे पर्यटन हीच आपल्या कोकणच्या पर्यटनाची खरी दिशा असली पाहिजे. सिंधुदुर्गाला आपण फक्त पर्यटनस्थळ म्हणून नव्हे, तर एक जिवंत अनुभव, जिवंत संस्कृती आणि जिवंत परिसंस्था म्हणून जगासमोर आणूया. कोकणात पर्यटनासाठी मोठी संधी आहे; पण त्याच वेळी मोठी जबाबदारीही आहे. आपल्याकडे समुद्र आहे, पण समुद्र वाचवण्याची जबाबदारी आहे. आपल्याकडे किल्ले आहेत, पण त्यांचा इतिहास जपण्याची जबाबदारीही आहे. आपल्याकडे समृद्ध लोकसंस्कृती आहे, पण ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आहे, असेही डॉ. सुमेधा नाईक म्हणाल्या.

चर्चासत्रात झालेल्या मांडणी व चर्चेच्या आधारे पुढील वाटचालीची दिशा व भूमिका यावर प्रा. प्रवीण बांदेकर, अभिजित हेगशेट्टे व युयुस्तु आर्ते यांनी मांडणी केली.चर्चासत्राचा समारोप बॅ.नाथ पै सेवांगण, मालवणचे अध्यक्ष  देवदत्त परुळेकर यांनी केला.चर्चासत्राचे सूत्रसंचालन एस एमजोशी सिशालिस्ट फाउंडेशनचे सहसचिव उपेंद्र टण्णू यांनी केले व आभार लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मानले.


 Give Feedback



 जाहिराती