वाशिम : प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने नातीनेच आजीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील पिंपळगाव इजारा येथे उघडकीस आली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी घडलेल्या या चोरीप्रकरणी आसेगाव पोलिसांनी नात नंदिनी रामेश्वर राठोड आणि तिचा प्रियकर रामेश्वर राठोड या दोघांना पिंपरी-चिंचवडमधील म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील सावरदरी येथून अटक केली आहे.
लग्नासाठी आजीच्या दागिन्यांची चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी हिने प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने आपली आजी यमुनाबाई चव्हाण यांच्या दागिन्यांची चोरी केली. या घटनेनंतर दोघेही तेथून निघून गेले होते. आजीच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी आसेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांचा तपास, दोघांना अटक
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. चोरीतील काही दागिने अनसिंग येथील सराफाकडे विकण्यात आल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. अखेर पिंपरी-चिंचवडमधील सावरदरी परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
१ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या प्रकरणाशी संबंधित ३० तोळे चांदीचे दागिने, अन्य ३२ तोळे चांदीचे दागिने, चांदी विकून मिळालेल्या पैशांतून खरेदी केलेली सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४६ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईमुळे महिनाभरापूर्वी घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, आसेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.