पुणे : दसऱ्याच्या सणामुळे पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डातील फूलबाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. सणासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याने बाजारात फुलांची आवक वाढली आहे. शनिवार आणि रविवारी मिळून सुमारे २०० ते ३०० टन झेंडूची फुले बाजारात दाखल झाली. झेंडूच्या दर्जानुसार प्रतिकिलो ३० ते ७० रुपये दर मिळत असल्याने बाजारात खरेदी-विक्रीला वेग आला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूची आवक अधिक झाली आहे. दसऱ्यानिमित्त घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि वाहनांच्या सजावटीसाठी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे पुण्यासह सोलापूर, धाराशिव, बीड आणि हिंगोली या भागांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीसाठी आणली आहेत.
झेंडूसोबतच शेवंती, गुलछडी, ॲस्टर आणि गुलाब या फुलांनाही ग्राहकांकडून चांगली मागणी मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे या फुलांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. सणासुदीच्या काळात फुलांची मागणी वाढल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
गुलटेकडी फूलबाजारातील विविध फुलांचे दर
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात झेंडूला प्रतिकिलो ३० ते ७० रुपये, गुलछडीला ३०० ते ५०० रुपये, ॲस्टरच्या गड्डीला ५० ते ७० रुपये, तर सुट्या ॲस्टरला २०० ते २५० रुपये दर मिळत आहे. शेवंतीचे दर ५० ते ३०० रुपये, गुलाबाच्या गड्डीचे दर ४० ते ६० रुपये आणि गुलछडीच्या काडीचे दर ५० ते १०० रुपये आहेत.
डच गुलाबाच्या २० नगांसाठी ८० ते १५० रुपये, जर्बेरासाठी ५० ते १०० रुपये आणि कार्नेशनसाठी १५० ते २५० रुपये दर मिळत आहेत. शेवंतीच्या काड्यांचे दर १५० ते २५० रुपये, लिलियमच्या १० काड्यांचे दर १ हजार ते १ हजार २०० रुपये, तर ऑर्किडचे दर ४०० ते ८०० रुपये आहेत.याशिवाय ग्लॅडिओलसच्या १० काड्यांना १०० ते १५० रुपये, जिप्सोफिलाला १०० ते २०० रुपये, लिलीच्या बंडलला २५ ते ४० रुपये, तर जुई आणि चमेलीला प्रतिकिलो ८०० ते १ हजार रुपये दर मिळत आहेत.
बाजार परिसरात शेतकऱ्यांकडून थेट विक्री
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांची आवक वाढल्याने मार्केट यार्ड परिसरातही लगबग दिसून येत आहे. बाजार आवाराबाहेरील शिवनेरी रस्ता तसेच गूळ-भुसार बाजार परिसरात शेतकरी पिकअप वाहनांतून फुले विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे या भागांतही फुलांच्या खरेदी-विक्रीची वर्दळ वाढली आहे.
दसऱ्याच्या दिवशी फुलांना मोठी मागणी असते. घरांच्या प्रवेशद्वारांवर तोरणे बांधण्यासाठी, वाहनांची सजावट करण्यासाठी तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी झेंडू आणि इतर फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे सोमवारीही बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी आणि बाजारातील फुलांची उपलब्धता याकडे व्यापारी, विक्रेते आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.