मुंबई : मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिद्धेश पाटील असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा नाशिकचा रहिवासी होता. विशेष म्हणजे, टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्याने आपल्या डॉक्टरांना संदेश पाठवून मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे सांगितले होते. या घटनेमुळे विद्यार्थी मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
डॉक्टरांना मेसेज; कुटुंबीयांनाही दिली माहिती
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिद्धेश हा आयसीटीमध्ये इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. मागील काही दिवसांपासून तो नैराश्याचा सामना करत होता आणि त्यावर उपचारही सुरू होते. घटनेच्या दिवशी त्याने आपल्या डॉक्टरांना संदेश पाठवून आत्महत्येचे विचार मनात येत असल्याचे कळवले होते.
हा संदेश मिळताच डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने सिद्धेशच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीयांनीही वेळ न दवडता वसतिगृहातील त्याच्या मित्रांना फोन करून त्याच्याकडे जाण्यास सांगितले. मात्र, मित्र मदतीसाठी पोहोचण्यापूर्वीच सिद्धेशने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
माटुंगा पोलिसांकडून तपास सुरू
काल रात्री साडेदहाच्या सुमारास वसतिगृहात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी पुढील कार्यवाही सुरू केली. सिद्धेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आयआयटी पवई येथेही विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना घडली होती. त्यानंतर आता आयसीटीमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माटुंगा पोलीस करत असून, घटनेमागील नेमकी कारणे तपासातून स्पष्ट होतील.