पुणे : अमली पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना केवळ गुन्हेगार म्हणून न पाहता, त्यांना व्यसनमुक्त करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संवेदनशील उपक्रम पुणे पोलिसांनी राबवला आहे. परिमंडळ तीनमधील पोलिसांनी ‘एनडीपीएस’ कायद्याच्या कलम ६४(अ) अंतर्गत १२ तरुणांना व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून दिली. यापैकी नऊ तरुणांना न्यायालयाने खटल्यातून कायदेशीररीत्या ‘डिस्चार्ज’ दिला असून, उर्वरित तिघांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. पोलिसांच्या या पुढाकारामुळे संबंधित तरुणांना नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी मिळाली आहे.
गुन्हेगारीवर कारवाई, तरुणांच्या पुनर्वसनावर भर
अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याबरोबरच, व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढणेही आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी पुनर्वसनाचा पर्याय पुढे आणला. वारजे, नऱ्हे, उत्तमनगर आणि नांदेड सिटी पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांमध्ये योग्य दृष्टिकोन ठेवून तरुणांना सुधारण्याची संधी देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
‘एनडीपीएस’ कायद्यातील तरतुदीचा उपयोग
अमली पदार्थांच्या व्यसनाशी झुंजणाऱ्या १२ तरुणांना किरकटवाडी येथील ‘आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन’च्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले. येथे त्यांना शास्त्रोक्त उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. उपचारांदरम्यान तरुणांनी व्यसनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे महिनाभरानंतर त्यांच्यात झालेल्या सकारात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन प्रक्रियेतही त्यांना दिलासा मिळाला.
उत्तमनगर आणि नांदेड सिटी येथील प्रत्येकी तीन, नऱ्हे येथील दोन आणि वारजे येथील एका तरुणाला न्यायालयाने खटल्यातून कायदेशीर ‘डिस्चार्ज’ दिला. उर्वरित तीन तरुणांच्या प्रकरणांवर सकारात्मक सुनावणी सुरू असल्याची माहिती आहे.
नऊ कुटुंबांना दिलासा; नव्या आयुष्याची सुरुवात
व्यसनामुळे तरुणांचे शिक्षण, रोजगार आणि कौटुंबिक आयुष्य प्रभावित होण्याची शक्यता असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी उपचारांसोबतच कुटुंबाचा आधार आणि समाजाची साथही महत्त्वाची ठरते. पुणे पोलिसांनी दाखवलेल्या या संवेदनशील भूमिकेमुळे नऊ तरुणांना कायदेशीर दिलासा मिळाला असून, त्यांच्या कुटुंबांनाही मोठा आधार मिळाला आहे.
तस्करांवर कठोर कारवाई, व्यसनाधीनांना पुनर्वसनाची संधी
अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका कायम ठेवतानाच, व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना उपचारांची संधी देण्याचा दृष्टिकोन पुणे पोलिसांनी स्वीकारला आहे. केवळ दंडात्मक कारवाई करून अमली पदार्थांची समस्या संपणार नाही, तर व्यसनाधीन व्यक्तींना योग्य उपचार आणि पुनर्वसन मिळणेही आवश्यक आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.पोलिसांच्या खाकी वर्दीमागील माणुसकीचा प्रत्यय देणारा हा उपक्रम व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.