पुणे : मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेता कुशल बद्रिके आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे सध्या चर्चेत आले आहेत. कुशल बद्रिकेनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अथर्व सुदामेबाबत नाराजी व्यक्त केली होती. कलाकारांना घरी बोलावूनही कांदेपोहे खायला न घातल्याचा आरोप त्यानं केला होता. या व्हिडीओनंतर आता अथर्व सुदामेनं स्वतःचा व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे, माफी मागण्याच्या अंदाजात त्यानं एका खास कार्यक्रमाची घोषणाही केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके यानं अथर्व सुदामेबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यानं अथर्वनं कलाकारांना घरी कांदेपोह्यांच्या कार्यक्रमासाठी बोलावलं; मात्र तिथे गेल्यानंतर कोणालाही कांदेपोहे खायला मिळाले नसल्याचं सांगितलं.
कलाकार उत्साहानं कार्यक्रमाला गेले होते. मात्र, त्यांना साधे कांदेपोहेदेखील मिळाले नाहीत, अशी तक्रार कुशलनं विनोदी; पण नाराजी व्यक्त करणाऱ्या शैलीत केली. केवळ व्हिडीओतून एखाद्याची खिल्ली उडवणं वेगळं आणि प्रत्यक्ष घरी बोलावून पाहुणचार न करणं वेगळं, असं म्हणत त्यानं अथर्वच्या कृतीवर आक्षेप घेतला.
अथर्व सुदामेनं व्हिडीओ शेअर करत काय सांगितलं?
कुशल बद्रिकेच्या व्हिडीओनंतर अथर्व सुदामेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यानं माफी मागण्याच्या अंदाजात कांदेपोह्यांच्या मुद्द्यावर भाष्य केलं. कलाकारांना घरी बोलावून कांदेपोहे खायला घालता आले नाहीत, यावरून लोक नाराज असल्याचं त्यानं सांगितलं.या व्हिडीओमध्ये अथर्व म्हणाला की, कलाकारांना घरी बोलावलं, पण साधे कांदेपोहेसुद्धा खायला घालता आले नाहीत. त्यामुळे कलाकारांसह लोकही नाराज झाले आहेत. या सगळ्यावर उपाय म्हणून त्यानं एक भन्नाट कल्पना आखल्याचं सांगितलं.
‘सुदाम्यांचे कांदेपोहे’ कार्यक्रमाची घोषणा
अथर्व सुदामेनं ‘सुदाम्यांचे कांदेपोहे’ या नावानं खास कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम केवळ कलाकारांसाठी मर्यादित नसून सर्वांसाठी खुला असणार असल्याचं त्यानं स्पष्ट केलं.याबाबत माहिती देताना अथर्व म्हणाला की, हा कार्यक्रम ९ नोव्हेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रेक्षकांना तिकीट काढावं लागणार आहे.अथर्वच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या या अनोख्या कार्यक्रमाबद्दल अनेकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.
कुशल बद्रिकेनं व्हिडीओतून व्यक्त केली होती नाराजी
अथर्व सुदामेबाबत बोलताना कुशल बद्रिकेनं आपल्याला यापूर्वी असा अनुभव कधीच आला नसल्याचं म्हटलं होतं. अथर्वनं कलाकारांना कांदेपोह्यांच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. त्यामुळे सर्वजण उत्साहानं तिथे गेले; मात्र कोणालाही कांदेपोहे मिळाले नाहीत, असं त्यानं व्हिडीओमध्ये सांगितलं.तसंच, व्हिडीओच्या माध्यमातून एखाद्याची मस्करी करणं समजू शकतो; पण घरी बोलावून पाहुण्यांचा अपमान करणं योग्य नसल्याचं मतही कुशलनं व्यक्त केलं होतं. या प्रकाराबाबत आपली नाराजी असल्याचं सांगत त्यानं अथर्वला सुनावलं होतं.
हा वाद की कार्यक्रमाचं प्रमोशन?
अथर्व सुदामेनं शेअर केलेल्या नव्या व्हिडीओनंतर या संपूर्ण प्रकरणाची चर्चा आणखी रंगली आहे. कुशल बद्रिकेचा व्हिडीओ आणि अथर्वचं उत्तर पाहता, हा संवाद विनोदी शैलीत कार्यक्रमाच्या प्रमोशनचा भाग असल्याचं दिसत आहे. अथर्वनंही माफी मागण्याच्या अंदाजात कार्यक्रमाची माहिती दिली आहे.आता ९ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या ‘सुदाम्यांचे कांदेपोहे’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.