सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब;काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
  • दसरा कार्यक्रमात रणबीर कपूरची जीभ घसरली! ‘सत्य आणि चांगुलपणाचा अंत होईल’ म्हणताच ट्रोलिंग, अभिनेत्याने मागितली माफी
  • जपानमध्ये भारतीय पॅरा जलतरणपटूवर लैंगिक छळाचा आरोप; पोलिसांनी घेतले ताब्यात, दुसऱ्याच दिवशी भारतात परत पाठवले
 क्राईम

जपानमध्ये भारतीय पॅरा जलतरणपटूवर लैंगिक छळाचा आरोप; पोलिसांनी घेतले ताब्यात, दुसऱ्याच दिवशी भारतात परत पाठवले

डिजिटल पुणे    22-10-2026 11:54:39

नागोया : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्सदरम्यान भारतीय पथकाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. भारतीय पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख याच्यावर हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आणि तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जपानी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी त्याला भारतात परत पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय पॅरालिम्पिक समितीकडून त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचाही विचार सुरू असल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे.

नागोयातील हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

मिळालेल्या वृत्तानुसार, सोमवारी नागोया येथील फोर पॉइंट्स बाय शेराटन हॉटेलमध्ये ही कथित घटना घडली. भारतीय पॅरा जलतरण संघातील खेळाडू या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. हाऊसकीपिंगच्या कामासाठी एका महिला कर्मचाऱ्याने संबंधित खेळाडूच्या खोलीत प्रवेश केला. त्यावेळी तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप आहे.

भारतीय पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक आयोजन समितीने या घटनेची माहिती भारतीय पथकाच्या शेफ-डी-मिशन कार्यालयाला दिली. हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि विनयभंग झाल्याची तक्रार समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी संबंधित भारतीय खेळाडूला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार, संबंधित खेळाडूने महिला कर्मचाऱ्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला, अश्लील हावभाव केले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिला कर्मचाऱ्याने खोलीबाहेर पडून आपल्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले.

तक्रारीनंतर जपानी पोलिसांची कारवाई

या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर जपानी पोलिसांनी ४० वर्षीय मोहम्मद शम्स आलम शेख याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्याचे वृत्त आहे. भारतीय पथकातील अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडून त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करून न्यायालयीन खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती.यानंतर स्थानिक आयोजन समितीने या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचे सांगितले जाते. भारतीय पथकाने संबंधित महिला कर्मचाऱ्याची लेखी माफी मागावी आणि आरोपांचा सामना करणाऱ्या खेळाडूला जपानमधून भारतात परत पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना करण्यात आल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला आहे.त्यानुसार, शेख याला रात्रीच्या मुक्कामासाठी दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर मंगळवारी त्याला नागोया येथून भारतात परत पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.

भारतीय पथकाच्या प्रतिमेला धक्का; आजीवन बंदीची शक्यता?

या घटनेमुळे भारतीय पथकातील अधिकाऱ्यांना अनेक तास पोलिस आणि हॉटेल व्यवस्थापनाशी चर्चा करावी लागल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी या प्रकरणाच्या हाताळणीत वेळ खर्च झाल्याचेही त्याने नमूद केले.

या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पथकाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे मत संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, भारतीय पॅरालिम्पिक समिती संबंधित खेळाडूवर आजीवन बंदी घालण्यासारखी कठोर कारवाई करू शकते, असा दावा करण्यात आला आहे.मात्र, या प्रकरणातील आरोप आणि संबंधित खेळाडूवरील संभाव्य कारवाईबाबत अधिकृत निष्कर्ष समोर येणे महत्त्वाचे आहे. आरोप सिद्ध होण्यापूर्वी त्याला दोषी ठरवता येणार नाही.


 Give Feedback



 जाहिराती