मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दसऱ्याच्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यामुळे रणबीरला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. सत्य आणि चांगुलपणाच्या विजयाबाबत बोलताना त्याच्या तोंडून चुकीचे शब्द निघाले. या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे.
नेमकं काय म्हणाला रणबीर कपूर?
२० ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रणबीर कपूर सहभागी झाला होता. यावेळी त्याने दसऱ्याचा संदेश सांगताना वाईटावर चांगल्याचा विजय होतो, अशी भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोलण्याच्या ओघात त्याच्याकडून शब्दांची गल्लत झाली.
दसरा हा सण आपल्याला कितीही शक्तिशाली वाईट प्रवृत्ती असल्या, तरी अखेरीस सत्य आणि चांगुलपणाचाच विजय होतो, हा संदेश देतो. मात्र, रणबीरने ‘सत्य आणि चांगुलपणाचा विजय होईल’ असे म्हणण्याऐवजी ‘सत्य आणि चांगुलपणाचा अंत होईल’, असे म्हटले. त्यामुळे त्याच्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप; चाहत्यांकडून समर्थन
रणबीरच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आगामी ‘रामायण’ चित्रपटात भगवान श्रीरामांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने असे वक्तव्य करणे योग्य आहे का, असा सवाल काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे, रणबीरच्या चाहत्यांनी त्याची बाजू घेतली आहे. मोठ्या कार्यक्रमात बोलताना त्याच्याकडून अनवधानाने शब्दांची चूक झाली असावी, असे म्हणत चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला. ही जाणीवपूर्वक केलेली टिप्पणी नसून केवळ बोलण्यातील चूक असल्याचेही काहींनी म्हटले.
चेन्नईतील कार्यक्रमात रणबीरने दिले स्पष्टीकरण
या वादानंतर रणबीर कपूरने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. सत्य आणि चांगुलपणाच्या विजयाऐवजी त्याच्या तोंडून चुकीचे शब्द निघाल्याचे त्याने स्पष्ट केले. २१ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ‘रामायण’ चित्रपटाच्या संगीत कार्यक्रमात आणि संपूर्ण संगीत अल्बमच्या लाँचप्रसंगी त्याने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले.
‘रामायण’मध्ये रणबीर साकारणार प्रभू श्रीरामांची भूमिका
दरम्यान, रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यश रावणाची, सनी देओल हनुमानाची आणि रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहेत.
नितेश तिवारी दिग्दर्शित या भव्य चित्रपटाकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची आणि त्याच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीची चाहत्यांना उत्सुकता आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या या एका चुकीच्या वक्तव्यामुळे सध्या रणबीर कपूर चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.