दौसा : राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आली आहे. १६ वर्षीय गर्भवती मुलीचे अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप तिघांविरुद्ध करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान मुलीची कारमध्येच प्रसूती झाली. मात्र, नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, रात्रीच्या वेळी तीन आरोपींनी तिला कारमध्ये बसवून तिचे अपहरण केले. त्यानंतर दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर कारमधून प्रवास करत असताना तिच्यावर आलटून-पालटून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकारादरम्यानच तिची कारमध्ये प्रसूती झाली. त्यानंतर आरोपींनी तिला दौसा येथील कलेक्टरेट चौक परिसरात रस्त्यावर सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
आधीच्या अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा आरोप
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता यापूर्वीच गर्भवती होती. अजय कुमार मीणा नावाच्या तरुणाने फेब्रुवारी आणि मे महिन्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित अत्याचारातूनच ती गर्भवती राहिल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शंकरलाल मीणा यांच्यासह कोलवा पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोहर लाल, कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी भगवान सहाय शर्मा आणि बांदीकुईचे डीएसपी लक्ष्मीकांत शर्मा यांनी प्रकरणाची माहिती घेतली.
अपहरण आणि सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून अपहरण आणि सामूहिक बलात्काराच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पीडिता अल्पवयीन असल्याने तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा आणि महिलांविरोधातील लैंगिक गुन्ह्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.