छत्रपती संभाजीनगर : पाणी हे जीवनाचे मूलभूत अधिष्ठान आहे. मानवी जीवनापासून शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येक घटक पाण्यावर अवलंबून आहे. पावसाची अनिश्चितता आणि बदलत्या हवामानामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई ही केवळ नैसर्गिक समस्या राहिलेली नाही, तर प्रभावी नियोजन आणि सुयोग्य व्यवस्थापनाची कसोटी ठरत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाला आवश्यक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, ही प्रशासनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. याच भूमिकेतून छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त भागातील टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी सर्वंकष कार्यपद्धती निश्चित केली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गौडा जी. सी. यांनी जिल्हास्तरीय पाणी टँकर संनियंत्रण व प्रत्यक्ष पाहणी समिती गठित करून पाणीपुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि अचूकता आणण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ऑक्टोबर 2026 ते जून 2027 या संभाव्य टंचाई कालावधीचा विचार करून ही कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
गरजेनुसार पाणीपुरवठा, नियोजनाला प्राधान्य
पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा हा नागरिकांसाठी मोठा आधार ठरतो. मात्र, हा पुरवठा केवळ मागणीवर आधारित न राहता प्रत्यक्ष गरजेनुसार व्हावा, यासाठी प्रशासनाने स्पष्ट निकष निश्चित केले आहेत. संबंधित गावाची किंवा वाडी-वस्तीची लोकसंख्या विचारात घेऊन दरडोई प्रतिदिन 20 लिटर पाण्याच्या निकषानुसार आवश्यक पाण्याचे प्रमाण निश्चित केले जाणार आहे. यासोबतच पशुधनाच्या पाण्याची गरजही विचारात घेतली जाणार आहे.
टँकरची मागणी करण्यापूर्वी ग्रामसभेचा अधिकृत ठराव आवश्यक करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनात ग्रामस्थांचा सहभाग वाढणार असून स्थानिक गरजांचे वास्तव चित्र प्रशासनासमोर येण्यास मदत होईल.
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पारदर्शकतेचा नवा अध्याय
पाणीटंचाई निवारणाच्या व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. प्रत्येक अधिकृत शासकीय अथवा खासगी टँकरवर जीपीएस उपकरण बसविण्यात येणार आहे. त्यामुळे टँकरच्या प्रत्येक खेपेची नोंद, प्रवासाचे अंतर आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा यांची पडताळणी करणे शक्य होईल.
टँकरच्या खेपांची डिजिटल नोंदवही ठेवण्यात येणार असून गावात पाणी पोहोचल्यानंतर ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षरीने त्याची खात्री केली जाईल. जीपीएस नोंदी आणि प्रत्यक्ष भरलेल्या पाण्याची पडताळणी केल्याशिवाय टँकरचे देयक अदा केले जाणार नाही.या व्यवस्थेमुळे शासकीय निधीचा योग्य विनियोग होण्यास मदत होईल. विशेषतः कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा यांतील तफावत टाळण्यासाठी ही कार्यपद्धती उपयुक्त ठरणार आहे.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केवळ टँकरची संख्या वाढविणे पुरेसे नाही. उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण, पुनर्भरण आणि संवर्धनही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे टँकरची मागणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना जलपुनर्भरणाच्या उपाययोजनांचे नियोजन करावे लागणार आहे. शिवकालीन पाणी साठवण योजना आणि जलपुनर्भरणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे.
आजची पाणीटंचाई दूर करतानाच उद्याची जलसुरक्षा निर्माण करणे, हा या निर्णयामागील व्यापक दृष्टिकोन आहे. टँकर ही तात्पुरती गरज असली, तरी जलसंधारण ही भविष्याची शाश्वत गरज आहे. त्यामुळे टंचाई निवारणासोबत जलसंवर्धनाची सांगड घालण्याचा प्रशासनाचा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरतो.
जलस्रोतांची पडताळणी आणि पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष
सार्वजनिक जलस्रोतांची उपलब्धता संपल्याची खात्री केल्यानंतरच टँकर मंजुरीची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आणि ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक यांचा संयुक्त पंचनामा आवश्यक असेल.
टँकर भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जलस्रोतांची क्षमता, उपलब्धता आणि पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. पाणीपुरवठ्याच्या स्रोतापासून गावापर्यंतचे अंतर जीपीएस किंवा गुगल मॅप्सद्वारे निश्चित केले जाणार आहे. अनावश्यक वाहतूक खर्च टाळण्यासाठीही प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
पिण्याचे पाणी केवळ उपलब्ध होणे पुरेसे नसून ते सुरक्षित आणि आरोग्यदायी असणेही आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी, सार्वजनिक वितरण टाक्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
प्रत्यक्ष पाहणीमुळे वाढणार उत्तरदायित्व
कोणतीही योजना प्रभावी ठरण्यासाठी तिची काटेकोर अंमलबजावणी आणि नियमित संनियंत्रण आवश्यक असते. याच अनुषंगाने जिल्ह्यात कार्यरत एकूण टँकरपैकी किमान पाच टक्के टँकरची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकारी टंचाईग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन मंजूर खेपा, प्रत्यक्ष पाणीपुरवठा, जलस्रोतांची स्थिती आणि ग्रामपंचायत स्तरावरील नोंदींची पडताळणी करणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील संभाव्य अनियमितता रोखण्यास मदत होईल.
या संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत राहणार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे सदस्य, तर तहसीलदार (नियोजन व आपत्ती व्यवस्थापन) सदस्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.
टँकरच्या खेपांमध्ये अनियमितता, बनावट नोंदी किंवा आदेशाचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
लोकसहभागातून शाश्वत जलसुरक्षेकडे
पाणीटंचाई निवारण ही केवळ प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून त्यात ग्रामपंचायत, स्थानिक संस्था आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पाण्याचा काटकसरीने वापर, उपलब्ध स्रोतांचे संरक्षण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि जलपुनर्भरण यांसारख्या उपक्रमांतून गावपातळीवर जलसुरक्षेचा पाया मजबूत करता येऊ शकतो.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेली ही सर्वंकष कार्यपद्धती म्हणजे केवळ टँकर व्यवस्थापनातील सुधारणा नाही, तर लोकाभिमुख, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि उत्तरदायी प्रशासनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे आणि तो गरजू नागरिकांपर्यंत योग्य वेळी, योग्य प्रमाणात व सुरक्षित स्वरूपात पोहोचणे हीच प्रभावी जलव्यवस्थापनाची खरी कसोटी आहे. या कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळण्याबरोबरच पाणीपुरवठा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल.जलसंधारणातून जलसमृद्धी आणि पारदर्शक व्यवस्थापनातून जलसुरक्षा, हाच शाश्वत भविष्याचा मार्ग आहे.