सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुशीलकुमार शिंदेंनी भाजपची ऑफर नाकारली, भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे मी बघितलयं
  • नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर रक्तरंजित थरार! लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या; चार वर्षांच्या प्रेमसंबंधांचा दुर्दैवी अंत
 जिल्हा

एसटी बसस्थानकांवरील अस्वच्छतेस विभाग नियंत्रक जबाबदार- मंत्री प्रताप सरनाईक

डिजिटल पुणे    23-10-2026 13:57:49

मुंबई : एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. प्रवाशांना स्वच्छ, निरोगी आणि आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची मूलभूत जबाबदारी असून, स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले.एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते.

स्वच्छता अधिभाराच्या बदल्यात दर्जेदार सुविधा द्या

एसटी महामंडळ प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारते. या अधिभाराच्या बदल्यात प्रवाशांना स्वच्छतेच्या किमान सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्यामुळे बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवणे आणि प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छतेच्या कामात कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये. प्रवाशांच्या रास्त अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक दक्षतेने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करा

बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवावे आणि संबंधित कंत्राटदार संस्थांकडून करारातील अटींनुसार स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले. स्वच्छतेची जबाबदारी केवळ कंत्राटदारांवर सोपवून चालणार नाही. आपल्या कार्यक्षेत्रातील बसस्थानकांवर नियमित स्वच्छता राखली जात आहे की नाही, याची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः करणे आवश्यक आहे. प्रवाशांना स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ बसस्थानके व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देण्यास महामंडळाने प्राधान्य द्यावे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती