पुणे : दिवाळीचा सण जवळ येत असताना पुणे पोलिसांनी फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीसंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच रस्त्यापासून १० मीटरच्या परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या फटाके विक्रीसाठी ६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत परवाने दिले जाणार आहेत. परवान्याची मुदत संपल्यानंतर फटाक्यांची विक्री करता येणार नाही. विक्री न झालेला शिल्लक साठा अधिकृत गोदामात किंवा घाऊक परवानाधारकाकडे जमा करणे आवश्यक असेल. तसेच, तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉलच्या ५० मीटर परिसरात आतषबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विदेशी बनावटीच्या फटाक्यांच्या विक्रीलाही मनाई करण्यात आली आहे.
आवाजाच्या फटाक्यांवर कडक निर्बंध
ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांच्या आवाजावरही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. फटाका उडविण्याच्या ठिकाणापासून चार मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यास बंदी आहे. तसेच, शंभरपेक्षा अधिक फटाके असलेल्या साखळी बॉम्बवर निर्बंध लागू आहेत. विशिष्ट प्रकारच्या ‘ॲटमबॉम्ब’च्या वापरावरही संबंधित नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे.
रात्री १० नंतर फटाके वाजवता येणार नाहीत
ध्वनिप्रदूषण नियंत्रणाच्या नियमांनुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत आवाज करणारे फटाके फोडण्यास मनाई असेल. या कालावधीत केवळ प्रकाश आणि रंग निर्माण करणारे बिनआवाजी फटाके तसेच नियमांनुसार परवानगी असलेले पर्यावरणपूरक ‘ग्रीन फटाके’ वापरण्याची मुभा असेल.रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या सभोवतालचा १०० मीटरचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात फटाके फोडण्यास मनाई राहणार आहे.
नियम मोडल्यास गुन्हा दाखल होणार
फटाके विक्री आणि वापराबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता, स्फोटक कायदा १८८४ आणि पर्यावरण संरक्षण कायद्यातील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करून ध्वनिप्रदूषण आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
शहरात कुठेही नियमबाह्य पद्धतीने फटाके फोडले जात असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी सांगितले.