पुणे : पुण्यातील बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे गावात अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मुलगी जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाळेच्या सहलीदरम्यान चित्रित केलेल्या व्हिडिओवरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सहलीतील व्हिडिओवरून वाद
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाळुंगे गावातील एका शाळेची सहल १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी-महाबळेश्वर येथे गेली होती. या सहलीदरम्यान एका कार्यक्रमात काही मुली नृत्य करत असतानाचा व्हिडिओ नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओवरून संबंधित विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर विद्यार्थ्याला हा व्हिडिओ हटवावा लागल्याची माहिती समोर आली आहे.
वादाचे रूपांतर हल्ल्यात
व्हिडिओवरून झालेल्या वादाचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्याने मुलीवर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आज दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी जखमी मुलीचा जबाब नोंदवला असून, संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. हल्ल्याचा आरोप असलेल्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
उच्चशिक्षित कुटुंबांतील मुलांचा सहभाग
या घटनेतील दोन्ही मुलांची कौटुंबिक पार्श्वभूमीही चर्चेत आली आहे. जखमी मुलीचे कुटुंब उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आरोपी मुलाचे आई-वडीलही उच्चशिक्षित असून, त्याचे वडील एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. आपल्या मुलाकडून असे टोकाचे कृत्य घडू शकते, यावर विश्वास बसत नसल्याची भावना त्याच्या पालकांनी व्यक्त केल्याचे समजते.
सोशल मीडियाच्या वापरावर पुन्हा प्रश्नचिन्ह
शाळकरी वयातील मुलांमध्ये सोशल मीडियाचा वाढता वापर आणि ऑनलाइन वादांचे प्रत्यक्ष आयुष्यात उमटणारे परिणाम यामुळे या घटनेने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे. अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत पालकांनी आणि शाळांनी अधिक जागरूक राहण्याची गरज या घटनेच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.या प्रकरणाचा तपास सुरू असून, घटनेबाबतची माहिती पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार देण्यात आली आहे.