नागपूर : भारतातील प्राचीन शिक्षण व्यवस्था अतिशय महान असून येथे तक्षशिला, नालंदा, विक्रमशिलासारखी विद्यापीठे अस्तित्वात होती. जगाच्या कानकोपऱ्यातून विद्यार्थी येथे ज्ञानार्जनासाठी येत. हे प्राचीन ज्ञान एवढे वैशिष्ट्यपूर्ण होते की तेव्हाही भारत जागतिक व्यापार, जीडीपी व निर्यातीतही वर्चस्व गाजवत होता. वर्तमानात दिशादर्शक ठरणाऱ्या प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्थेचा वारसा जपणे ही येणाऱ्या पिढीची मोठी जबाबदारी व काळाचीही गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ९ व्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोपीय समारंभात बोलत होते. मिहान येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट(आयआयएम) येथे आयोजित या कार्यक्रमास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, माजी खासदार डॉ. नितीश भारद्वाज यांची विशेष उपस्थिती होती. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ.भीमराया मेत्री, द साऊथ पब्लिक स्कूलच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी दस्तुरे, सनफ्लॉवर व तायची पब्लिशिंगचे व्यवस्थापकीय संचालक राजेश घई, नवनीत प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष (एज्युकेशनल बुक्स डिव्हिजन) देविश गाला, द साऊथ पब्लिक स्कूलचे संचालक दिवेन दस्तुरे, न्यू सरस्वती हाऊसचे नॅशनल सेल्स हेडचे प्रमुख विरल उपाध्याय, एड्युव्हेटचे प्रमुख नुपूर मराठे आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे सहयोगी संचालक रविशंकर रथ आदी यावेळी उपस्थित होते.
प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीची महानता सांगताना श्री. फडणवीस यांनी आचार्य चाणक्य, पाणिनी या विद्वानांचे व त्यांच्या ग्रंथाचे दाखले दिले. ते म्हणाले, पूर्वी शिक्षणाची प्रणाली ‘शास्त्र’ व ‘संवाद’ रुपात होती. ज्ञान केवळ सैद्धांतिक नव्हते तर उपयोजित व कौशल्य-आधारित होते. त्यातूनच राष्ट्रीय, सामाजिक व वैयक्तिक विकास साधता येतो. ‘एआय’च्या युगात मानवी मूल्ये, नीतिमत्ता व चारित्र्य जपण्याची मोठी जबाबदारी नव्या पिढीवर असून आपल्या शिक्षण प्रणालीचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांभोवतीच्या अनेक चर्चा आपण ऐकतो. या परिषदेने ‘जनरेशन वॉव’ (वर्ल्ड ऑफ वंडरफुल जनरेशन) ही नवी संकल्पना मांडली असून ‘झेन झी’ किंवा ‘जेन अल्फा’पेक्षा ती निराळी आहे. ही पहिली पिढी आहे, जी माहितीच्या स्फोटासोबत जन्माला आली व तंत्रज्ञानाच्या स्फोटासोबत वाढत आहे. ‘मिलेनियल्स’ अशी पिढी आहे की ज्यांच्या आयुष्याचा नंतरचा भाग विकसित तंत्रज्ञानासोबत जात आहे. ‘जनरेशन वॉव’कडे प्रचंड प्रमाणात माहिती व अफाट उगमस्थाने आहे. त्याचे ज्ञानात रूपांतर करण्याची व त्याचा विचारपूर्वक वापर करण्याची दुहेरी जबाबदारी या पिढीवर आहे. ज्ञान हे त्या माहितीवर प्रक्रिया करण्याचे शहाणपण आहे. त्या माहितीला एक नैतिक स्वरूप देणे, योग्य-अयोग्य ओळखणे व संवेदनशीलतेने ते आचरणात आणणे हेच आज खरे आव्हान आहे.
सध्याच्या माहितीच्या स्फोटाच्या काळात वावरणाऱ्या पिढीला उपलब्ध माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे शहाणपण अंगी बाणवता आले पाहिजे. सध्याच्या काळात शिक्षक – अध्यापकांची भूमिका ही विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्या विचार प्रक्रियेला योग्य तो आकार देण्याची असली पाहिजे. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी आवश्यक ती सखोल चर्चा व मंथन या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे ही परिषद महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
श्री. फडणवीस म्हणाले, अनेक आक्रमणांमुळे आपल्या देशातील विद्यापीठे व व्यवस्था कोलमडली. विल्यम अॅडम यांच्या सर्वेक्षणानुसार बंगाल, बिहार, पंजाब राज्यांमध्ये लक्षावधी शाळा होत्या. मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये हजारो व्याकरणशाळा होत्या. आपल्यावर राज्य करणाऱ्यांच्या ह्या नोंदी आहेत. यावरून प्राचीन भारतातील शैक्षणिक समृद्धता लक्षात येते. परंतु ही शैक्षणिक पद्धती व प्रणाली दीर्घकाळ टिकू शकली नसली तरी येथील समाज सुधारकांनी घडवून आणलेल्या क्रांतीने येथे शिक्षणाची बीजे पुनःश्च रोवल्या गेली. त्यातून आपण विकास साधत आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत या क्षेत्रात अनेक नवीन पद्धतींचा अवलंब करण्यात येत आहे. आपण आपले लक्ष आता नव्या पिढीवर केंद्रित केले पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करणे आपल्याच हातात असून आपण या नव्या पिढीची नवी जडणघडण करायला हवी. मातृभाषेची कास आपण सोडता कामा नये कारण विकसित देशांची शिक्षण प्रणाली त्यांच्या मातृभाषेत आहे. नवीन शैक्षणिक धोरणात याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या आहारी जाण्यापेक्षा ते वापरण्याचे कौशल्य आपण आत्मसात केले तर सर्वांगीण विकास साधता येणे शक्य आहे, असा विश्वास श्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
श्री. पंकज भोयर म्हणाले, ‘वर्ल्ड ऑफ वंडरफुल जनरेशन’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेत शिक्षण क्षेत्रातील आव्हानांवर सखोल चर्चा पार पडल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश २०२४७ च्या ‘विकसित भारत’ या लक्ष्याकडे वाटचाल करत असून, महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, आणि ‘मुख्यमंत्री विज्ञान विद्यार्थी वारी’ यांसारखे उपक्रम राबवले जात आहे. या शिक्षण केंद्री उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास होत आहे. शिक्षण केवळ ज्ञान मिळवण्यासाठी नसून समाज परिवर्तनासाठी आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासोबतच त्यांच्यातील उपजत कलागुणांना वाव देण्याचे महत्त्वाचे काम करत असून त्यांचे मोलाचे योगदान आहे.
यावेळी श्री फडणवीस यांच्या हस्ते ‘पाथेय– द गोल्डन एलिक्सिर’ (Pathey – The Golden Elixir) या ई-स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, शिक्षण आणि संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समर्पित व्यक्तींना प्रतिष्ठित ‘नचिकेता’ आणि ‘सुपर नचिकेता’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सर्वोत्तम नचिकेता पुरस्कार श्री नितीश भारद्वाज यांना लाईफ टाईम नचिकेता पुरस्कार, श्रीमती रजिया हुसेन व श्रीमती श्रद्धा केळापुरे यांना व अकॅडमिक्स कन्सल्टंटच्या संचालिका व प्रमुख डॉ. इंदिरा नयना, सेंटर पॉईंट शाळेच्या प्राचार्या श्रीमती कंचन उके यांना सुपर नचिकेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दस्तुरे यांनी केले तर आभार मंगेश चिनेवार यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.