पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे भासवून कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घालत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने पतीला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने आरोपीला ७० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. विशेष म्हणजे, सुनावणीदरम्यान पत्नीने पतीविरोधातील आरोप नाकारले होते. मात्र, वैद्यकीय पुरावे आणि अन्य साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी २०२३ मध्ये उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीने तिला कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे सांगत कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खायला दिल्याचा आरोप होता.
पोटात तीव्र वेदना, शौचावाटे बाहेर पडले ब्लेडचे तुकडे
ऑक्टोबर २०२३ मध्ये पीडित महिलेच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. यादरम्यान दोन वेळा शौचावाटे ब्लेडचे तुकडे बाहेर पडले. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी त्रास वाढल्याने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान तिच्या पोटात ब्लेडचा आणखी एक तुकडा आढळून आला. या घटनेचा तपास करताना पतीच्या कथित कृत्याबाबत माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
न्यायालयात पत्नीने बदलली साक्ष
खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित महिलेने पतीविरोधातील आरोप नाकारले. तसेच, दोघांमधील वाद मिटल्याचेही तिने न्यायालयात सांगितले. मात्र, सरकारी पक्षाने सादर केलेले वैद्यकीय पुरावे आणि इतर साक्षीदारांचे जबाब आरोपीविरोधातील आरोप सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे ठरले.
सरकारी पक्षातर्फे ॲड. पाठक यांनी बाजू मांडली. त्यांनी खटल्यात सात साक्षीदार तपासले. संबंधित ब्लेडचा तुकडा प्राणघातक ठरू शकत होता आणि त्यामुळे महिलेचा मृत्यू होण्याची शक्यता होती, अशी साक्ष डॉक्टरांनी दिली. केवळ साक्षीदार फितूर झाला म्हणून त्याची संपूर्ण साक्ष नाकारता येत नाही, असा युक्तिवादही सरकारी पक्षाने केला.
वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचा निकाल
अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या न्यायालयाने उपलब्ध वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करून आरोपीला दोषी ठरवले. पत्नी सध्या आरोपीसोबत राहत असून ती त्याच्यावर अवलंबून असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. या परिस्थितीचा विचार करून आजन्म कारावासाऐवजी ठराविक मुदतीची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा पुरेशी ठरू शकते, असे न्यायालयाने निकालात नमूद केले.पत्नीने न्यायालयात आरोप नाकारले असतानाही वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आरोपीला शिक्षा झाल्याने या प्रकरणात न्यायालयाने परिस्थितीजन्य पुरावे आणि वैद्यकीय साक्षीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.