धायरी : प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या जनसंवाद अभियानाचे १९ वे सत्र धायरी-बेनकर वस्तीतील ऋतूनगरी परिसरात पार पडले. या वेळी नागरिक, विविध गृहसंस्थांचे पदाधिकारी आणि सोसायट्यांमधील रहिवाशांनी सहभागी होत परिसरातील नागरी प्रश्न मांडले.
नागरिकांशी थेट संवाद साधणे, संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय साधणे आणि प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी पाठपुरावा करणे, या उद्देशाने प्रभागातील विविध भागांत हे अभियान आयोजित केले जाते. प्रत्येक सत्रात स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जातो.
ऋतूनगरीतील सत्रात नागरिकांनी ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतूक यांसह विविध नागरी प्रश्न मांडले. या समस्यांवर संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नगरसेवक हरिदास चरवड यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करून समस्यांची माहिती घेण्यात आली. तसेच प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्यक्ष पाहणी, अधिकाऱ्यांशी चर्चा आणि प्रशासकीय समन्वयातून समस्या सोडवण्यावर या अभियानात भर देण्यात आला.
प्रभागातील प्रत्येक भागातील नागरिकांना समस्या मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जनसंवाद अभियान विविध ठिकाणी राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या समस्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्यांच्या निराकरणासाठी पाठपुरावा केला जात आहे.
ऋतूनगरी येथे झालेले १९ वे जनसंवाद अभियान नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. प्रभागातील विविध भागांत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा हा उपक्रम पुढेही सुरू राहणार आहे.