पुणे : पुण्यातील स्वारगेट परिसरात धावत्या इलेक्ट्रिक शिवाई बसला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. सेव्हन लव्ह्ज चौकातून स्वारगेटच्या दिशेने जात असताना बसमधून धूर आणि ज्वाळा येऊ लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि त्यातील सर्व १७ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित शिवाई बस सोमवारी सकाळी स्वारगेटच्या दिशेने जात होती. बसमध्ये त्यावेळी १७ प्रवासी प्रवास करत होते. प्रवास सुरू असतानाच अचानक बसमधून धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने बस रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यानंतर बसमधील प्रवाशांना तत्काळ खाली उतरवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. वेळीच प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.
शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज
बसला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. चालकाने दाखवलेली तत्परता आणि वेळेत करण्यात आलेल्या बचावकार्यामुळे १७ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.