मुंबई : संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणारे ‘हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र’ हे विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संत रविदास महाराजांनी मांडलेले मानवता, समता, करुणा आणि दुःखमुक्त समाजाचे विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावेत. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा उभारावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित विशेष अभियानाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र चव्हाण, संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक रविंद्र राठोड हे उपस्थित होते.तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि बार्टीच्या महासंचालिका डॉ. दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक सामाजिक आणि वैचारिक अभिसरण घडवून आणणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संत रविदास महाराजांनी समता, मानवता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाची शिकवण दिली. हे विचार केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावेत, यासाठी प्रयत्न करावेत. संत रविदास महाराजांच्या विचारांवर आधारित हे अभियान समाजातील सर्व घटकांना जोडणारे आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करणारे ठरेल.
विविध सामाजिक परंपरांमधील साम्यस्थळे आणि संतविचारांतील एकात्मतेचा संदेश समाजासमोर आणून सामाजिक सलोखा व बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी या अभियानाचा उपयोग होईल. ‘हिंद की चादर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध समाजघटकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. त्याच धर्तीवर संत रविदास महाराजांच्या जयंती वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांतूनही सामाजिक एकतेचा व्यापक संदेश दिला जावा. या अभियानासाठी संबंधित विभागांनी स्वतंत्र अंमलबजावणी यंत्रणा उभारून निर्धारित कार्यक्रम वेळेत पूर्ण करावेत. अभियानाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतच्या कामांचा सातत्याने आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्याच्या माध्यमातून व्यापक जनजागृतीवर भर – मंत्री गिरीश महाजन
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम नाशिक येथे होणार आहे. या कुंभमेळ्यात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक व नागरिक सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर संत रविदास महाराजांचे विचार आणि त्यांच्या जयंती वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या अभियानाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविता येईल. कुंभमेळ्यात येणाऱ्या दहा कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत कमी खर्चात प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव आहे. व्यापक जनसहभागाच्या माध्यमातून संत रविदास महाराजांच्या विचारांचा प्रसार करणे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले
समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणार – मंत्री संजय शिरसाट
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकत्रितपणे पुरस्कार देऊन सन्मानित करावे. नागपूर विभाग, यवतमाळ तसेच राज्यातील अन्य भागांत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विभागनिहाय मर्यादित न ठेवता एकाच व्यासपीठावर सन्मानित करण्याची यामागील संकल्पना आहे. या उपक्रमातून समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.
संत रविदास महाराजांच्या नावाने विशेष योजना – मंत्री संजय सावकारे
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी संत रविदास महाराजांच्या नावाने विशेष योजना सुरू करण्याची सूचना मांडली. या योजनेत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती तसेच नव्या क्षेत्रांत काम करणाऱ्या युवकांना आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद असावी. संत रविदास महाराजांचे साहित्य महाराष्ट्रात अधिक व्यापक स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी त्याचे संकलन, प्रचार आणि प्रसार करण्यासंदर्भात नियोजन करण्यात यावे. अनुसूचित जातीतील युवकांच्या नवकल्पना आणि उद्योजकीय उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी संत रविदास महाराजांच्या नावाने स्वतंत्र निधी किंवा विश्वस्त संस्था स्थापन करून आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी मांडली.
संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम
संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी प्रास्ताविक केले. संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षाचे सहसमन्वयक रविंद्र राठोड यांनी सादरीकरण करून उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ‘हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
विविध शासकीय विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात धार्मिक स्थळे, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, व्यापारी आणि कामगार संघटना, महिला बचतगट, युवक मंडळे, शासकीय क्षेत्रीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महामंडळे आणि आरोग्य संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामस्तरावरील समित्यांच्या माध्यमातून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल.
राज्यातील १ लाख ८ हजार १३९ शाळा, ५ हजार ८४१ महाविद्यालये, ६५ विद्यापीठे आणि ११ हजार १५० सार्वजनिक ग्रंथालयांना या अभियानाशी जोडण्याचे नियोजन आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, संतसाहित्य वाचन, संशोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. यासोबतच विविध सामाजिक सेवा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता आणि मानवतेच्या मूल्यांची रुजवण केली जाणार आहे.
अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, नेत्र व दंत तपासणी, महिला व बाल आरोग्य, पोषण, व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेविषयी जनजागृती असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. श्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘श्रमवीर सन्मान’, कारागिरांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, महिला आर्थिक स्वावलंबन आणि युवा सेवा सप्ताह यांचे आयोजन केले जाईल.
राज्यातील ६५० गावांमध्ये विचारसभा आणि वृक्षारोपणाचे नियोजन आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन प्रचार वाहनांच्या माध्यमातून संत रविदास महाराजांच्या विचारांचा प्रसार केला जाणार आहे. चित्रफिती, पॉडकास्ट, मुलाखती आणि संवादात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत अभियानाचा संदेश पोहोचविण्यात येईल.
डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासाठी ‘डिजिटल रविदास ६५०’, ई-ग्रंथालय, डिजिटल प्रश्नमंजुषा आणि ६५० प्रेरणादायी व्हिडिओ कथांचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून संत रविदास महाराजांचे विचार, सामाजिक समतेचा संदेश आणि अभियानातील उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल.
या अभियानाचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम १३ व १४ फेब्रुवारी २०२७ रोजी नाशिक येथे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमात बेगमपुरा संकल्पना, संत संगम, सांस्कृतिक कार्यक्रम, समता महामंच, संत रविदास वारसा प्रदर्शन, संवाद केंद्र आणि सामुदायिक अन्नसेवा यांचा समावेश असेल.मुख्य कार्यक्रमानंतर ‘समाजकुंभ’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक परंपरांना एकत्र आणून समता, बंधुता, सामाजिक एकात्मता आणि मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्यासंदर्भातील नियोजन करण्यात आले.