मुंबई : मुंबई पोलीस दलातून एक दुःखद घटना समोर आली आहे. कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांचा कर्तव्यावर येत असताना मृत्यू झाला. नवी मुंबईतील उलवे येथून मुंबईच्या दिशेने येत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी गाडीतच काही वेळ विश्रांती घेण्याचे ठरवले. मात्र, कुरार पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतरही ते उठले नाहीत. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
गाडीत आराम करण्यासाठी घेतली उशी; मात्र उठलेच नाहीत
मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड हे नवी मुंबईतील उलवे येथील आपल्या निवासस्थानातून नियमित कर्तव्यासाठी मुंबईकडे निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी सोबत असलेल्या चालक आणि ऑपरेटरला याबाबत सांगितले. प्रकृती ठीक नसल्याने काही वेळ गाडीतच आराम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी उशीही मागितली होती.
त्यानंतर ते गाडीत झोपले. गाडी कुरार पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर चालकाने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार आवाज देऊनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. चालकाने त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर चालक आणि ऑपरेटर यांनी तातडीने त्यांना मालाड येथील पठाणवाडी परिसरातील डीएनए रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
डीसीपींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर घरी गेले होते
मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी आदल्या दिवशी पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर ते उलवे येथील घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्तव्यावर येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या अचानक जाण्याने सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
एका महिन्यात दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा मृत्यू
विशेष म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी जाधव यांचाही मृत्यू झाला होता. अवघ्या काही आठवड्यांच्या अंतराने दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलातील कामाचा ताण, कामाच्या वेळा आणि आरोग्याच्या प्रश्नांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना सुमारे सात महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक पदावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती, अशी माहिती समोर आली आहे.
कामाचा ताण आणि वरिष्ठांच्या दबावाबाबत चर्चा
पोलीस दलात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. हद्दीतील फेरीवाले, एसआरए, एमएमआरडीए, वन विभागासह विविध विषयांशी संबंधित कामांचा पाठपुरावा करावा लागत असल्याने अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या कामाच्या दबावाबाबतही नाराजी व्यक्त केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गायकवाड यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि कामाच्या ताणाशी त्याचा काही संबंध होता का, याबाबत अधिकृत निष्कर्ष उपलब्ध नसताना कोणताही ठोस दावा करता येणार नाही.या घटनेमुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी, नियमित वैद्यकीय तपासणी, पुरेशी विश्रांती आणि कामाच्या वेळांचे नियोजन या मुद्द्यांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.