सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
  • अखेर हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ३ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
  • पुण्यात मतमोजणी केंद्रावर महायुती-मविआचे कार्यकर्ते आमनेसामने; जेवणाच्या ट्रकवरून गोंधळ, मतपेट्यांच्या सीलवरही आक्षेप!
  • मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर नवे वाहतूक नियम; मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी, कार-बसमधील वेगमर्यादाही निश्चित!१ नोव्हेंबरपासून नियमांची अंमलबजावणी; कारसाठी ताशी १००, तर प्रवासी बससाठी ८० किमी वेगमर्यादा
  • पुणे पदवीधरच्या मतमोजणीपूर्वीच गोंधळ; पेन, कागद नेण्यास पोलिसांचा मज्जाव; प्रभाकर देशमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
  • पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप
 जिल्हा

पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात; ठाकरे गट आणि मनसेचे नेते नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल, ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा!

डिजिटल पुणे    27-10-2026 18:48:20

ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. हत्येला २७ दिवस उलटूनही मुख्य सूत्रधारांना अटक झालेली नसल्याचा आरोप करत त्यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने परिसरात नाट्यमय घडामोडी घडल्या.

वडिलांच्या हत्येला २७ दिवस; सूत्रधारांच्या अटकेची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून, इतर संशयितांची चौकशी सुरू आहे. मात्र, हत्येमागील सूत्रधारांवर कारवाई झालेली नसल्याचा आरोप राम पूर्णेकर यांनी केला आहे.

या प्रकरणात ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजा शिंदे यांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राम पूर्णेकर यांनी केली. याच मागणीसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचे ठरवले होते.

पोलिसांनी रिक्षातून नेले पोलीस ठाण्यात

आंदोलन करण्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना रिक्षातून पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राम पूर्णेकर रिक्षात बसण्यास तयार नव्हते. यावेळी पोलीस अधिकारी त्यांची समजूत काढताना दिसले.

‘राम, माझं ऐक, माझ्यावर विश्वास ठेव, रिक्षात बस,’ अशा शब्दांत एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांच्या हत्येचा उल्लेख करत राम पूर्णेकर भावुक झाले. ‘सर, माझे वडील गेलेत,’ असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले. या प्रसंगामुळे घटनास्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले.

ठाकरे गट आणि मनसेचे नेते पोलीस ठाण्यात

राम पूर्णेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घडामोडींमुळे पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी झाली आणि प्रकरणाला नवे वळण मिळाले.

बाळू पूर्णेकर हत्या प्रकरणातील सूत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी आणि राम पूर्णेकर यांना ताब्यात घेण्याची पोलिसांची कारवाई यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती