पुणे : पुण्यातील बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत परराज्यांतील मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी-बंडगार्डन रस्त्यावरील एक्साइज कॉलनी परिसरातील एका हॉटेलमध्ये एजंटांच्या माध्यमातून तरुणींना आणून देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने तपास सुरू केला.
पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली. त्यानंतर संबंधित हॉटेलमध्ये अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली.
पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप
प्राथमिक तपासात आरोपी एजंट तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आसाममधील रोहन ऊर्फ राजकुमार (वय ३२), विवेक ऊर्फ मयंक कबीर (वय ३४), विक्रम ऊर्फ पियुष (वय ३४) आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, तरुणींना या व्यवसायात कशा प्रकारे सहभागी करून घेतले जात होते आणि यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा शोध घेतला जात आहे.