सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेगाड्यांची भीषण धडक; ४६ जणांचा मृत्यू, १७९ प्रवासी जखमी
  • अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
  • केंद्रीय कर्मचार्‍यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ, मोदी सरकारकडून 10,016 कोटी मंजूर
  • उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
 शहर

विंचवांच्या जीवनशैलीचा आणि पर्यावरणातील भूमिकेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे महत्त्वाचे – मिहीर जोशी

डिजिटल पुणे    28-10-2026 16:13:41

पुणे : जीविधा संस्थेतर्फे आयोजित पर्यावरण व्याख्यानमालेत मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मिहीर जोशी यांनी ‘विंचू आणि विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन केले. या व्याख्यानातून विंचवांची शरीररचना, त्यांच्या विविध प्रजाती, विषाची वैशिष्ट्ये, प्रजनन प्रक्रिया आणि अधिवास यांविषयी रंजक माहिती देण्यात आली.'जीविधा' चे राजीव पंडित, वृंदा पंडित यांनी मिहीर जोशी यांचे स्वागत केले.या व्याख्यानातून विंचवांविषयीच्या अनेक समजुती दूर करण्यास आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनाचा अभ्यास करण्यास मदत झाली. विंचू हे केवळ भीती निर्माण करणारे जीव नसून त्यांच्या जीवनशैलीचा आणि पर्यावरणातील भूमिकेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे महत्त्वाचे आहे,असा संदेश देण्यात आला.  ही व्याख्यानमाला सोमवार, दि. २६ ते शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसहा वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्र नगर, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचे हे १६ वे वर्ष आहे.

विंचवांची शरीररचना आणि त्यांच्या विविध प्रजातींची वैशिष्ट्ये यांविषयी माहिती देताना जोशी यांनी सांगितले की, भारतात विंचवांच्या सुमारे ३५० ते ४०० प्रजाती आढळतात. भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय प्रदेशांनुसार विंचवांच्या प्रजाती तसेच त्यांच्या विषाच्या तीव्रतेत फरक आढळू शकतो. विंचू आपल्या संरक्षणासाठी तसेच भक्ष्य पकडण्यासाठी विषाचा वापर करतात.विंचवांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते अल्ट्राव्हायोलेट (UV) प्रकाशात चमकताना दिसतात. विंचवांच्या बाह्यकंकालातील काही रासायनिक घटकांमुळे ही चमक दिसते. यामध्ये बीटा-कार्बोलिन (Beta-carboline) या रासायनिक संयुगाचा उल्लेख केला जातो. UV प्रकाशाच्या मदतीने अंधारातही विंचू स्पष्टपणे पाहता येतात. त्यामुळे संशोधन आणि निरीक्षणासाठी या तंत्राचा उपयोग होतो.

विंचवांच्या प्रजनन प्रक्रियेबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, मिलनाच्या वेळी नर आणि मादी विंचू विशिष्ट हालचाली करतात. या हालचाली एखाद्या नृत्याप्रमाणे दिसतात आणि काही प्रजातींमध्ये ही प्रक्रिया साधारण अर्धा ते एक तास चालू शकते. विंचवांच्या प्रजनन प्रक्रियेतील हा रंजक भाग उपस्थितांसाठी विशेष कुतूहलाचा विषय ठरला.मादी विंचू आपल्या पिल्लांना पाठीवर घेऊन फिरते. पिल्लांच्या सुरुवातीच्या विकासाच्या काळात मादीच्या शरीरातून स्रवणाऱ्या पोषक द्रव्यांचाही त्यांना आधार मिळतो. पिल्ले वाढून स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम झाल्यानंतर ती मादीच्या पाठीवरून उतरतात. एका वेळी साधारणपणे २० ते २५ पिल्ले जन्माला येऊ शकतात; मात्र ही संख्या प्रजातीनुसार बदलते.

विंचवांचे अधिवासही विविध प्रकारचे असतात. काही विंचू खडकांच्या फटीत, दगडांखाली आणि जमिनीतील बिळांमध्ये राहतात, तर काही प्रजाती झाडांवर आढळतात. Isometrus या प्रजातीतील विंचू झाडांवर राहणारे म्हणून ओळखले जातात. कोकणातील काही भागांत विंचू घरांच्या कौलांवरही आढळतात. गवताळ प्रदेश, वाळवंट आणि जंगल अशा विविध परिसंस्थांमध्ये विंचवांचे अस्तित्व दिसून येते.विंचवांची प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता हा आणखी एक महत्त्वाचा विषय होता. काही विंचू अन्नाशिवाय दीर्घकाळ, अगदी वर्षभरापर्यंतही जगू शकतात. त्यांच्या आयुष्याचा कालावधी प्रजातीनुसार बदलतो आणि काही प्रजाती साधारण पाच वर्षे जगू शकतात.

 


 Give Feedback



 जाहिराती