सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेगाड्यांची भीषण धडक; ४६ जणांचा मृत्यू, १७९ प्रवासी जखमी
  • अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
  • केंद्रीय कर्मचार्‍यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ, मोदी सरकारकडून 10,016 कोटी मंजूर
  • उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
 शहर

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंच्या विजयाची औपचारिकता बाकी; 6,770 मतांची आघाडी, म्हणाले, “हा विजय माझ्या एकट्याचा नाही, सर्व शिक्षकांचा!”

डिजिटल पुणे    28-10-2026 16:42:34

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी निर्णायक आघाडी घेतली असून, त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे चित्र आहे. कौस्तुभ गावडे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले उमेदवार सचिन सानप यांच्यात 6,770 मतांचे अंतर असल्याची माहिती समोर आली आहे. मतमोजणी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना, या यशानंतर कौस्तुभ गावडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“हा विजय सर्व शिक्षकांचा”; कौस्तुभ गावडेंची पहिली प्रतिक्रिया

आपल्या विजयाबद्दल भावना व्यक्त करताना कौस्तुभ गावडे म्हणाले, “आई अंबाबाईला स्मरून सांगतो, हा विजय माझ्या एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा आहे. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी मी रस्त्यावर उतरून लढा दिला. त्या दिवसापासून माझे जीवन शिक्षकांसाठी समर्पित केले आहे. शिक्षकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेले आशीर्वाद याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.”

पुणे शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून येण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. मतमोजणीची अंतिम फेरी बाकी असली, तरी मिळालेल्या मताधिक्यामुळे विजयाबाबत विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वयावरून टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार

कौस्तुभ गावडे यांच्या वयावरून निवडणुकीदरम्यान टीका करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, त्यांनी आजपर्यंत कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर दिलेले नाही आणि यापुढेही वैयक्तिक टीका करणार नाहीत. मात्र, आपल्या कामातून टीकाकारांना उत्तर देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“माझ्या वयाचा मुद्दा उपस्थित करून टीका करण्यात आली; मात्र शिक्षकांनीच आपल्या मतदानातून त्याचे उत्तर दिले आहे. आगामी काळात माझ्या कामाच्या माध्यमातून वयाचा दाखला देणाऱ्यांची टीका पुसून काढेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार

पुणे शिक्षक मतदारसंघ हा सुज्ञ शिक्षकांचा मतदारसंघ असल्याचे सांगत गावडे यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका मांडली. कोणाचाही पराभव केल्याचा दावा करण्यापेक्षा शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी आणि विद्यमान आमदारांकडून झालेल्या चुका पुन्हा होऊ देणार नाही, असे सांगत शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत पैसे वाटप केल्याच्या आरोपांवर बोलताना, मतदान 23 तारखेला झाले असताना असे आरोप आता का केले जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्याला 23 हजारांहून अधिक मते मिळाल्याचे सांगत त्यांनी 6,770 मतांच्या आघाडीचाही उल्लेख केला.

भाजपच्या कामगिरीवरही गावडेंची प्रतिक्रिया

राज्यातील विधानपरिषद निवडणुकांमधील पक्षाच्या कामगिरीवर भाष्य करताना गावडे यांनी मतदारांचा कौल स्वीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले. काही जागांवर महाविकास आघाडीला मतदारांनी पसंती दिली असल्याचे नमूद करत, आगामी निवडणुकांमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा यश मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पतीच्या यशानंतर मयुरी गावडे भावुक

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या पत्नी मयुरी गावडे यांनीही भावना व्यक्त केल्या. कोल्हापुरातील त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. अवघ्या तिसाव्या वर्षी कौस्तुभ गावडे शिक्षक आमदार होण्याच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

काही महिन्यांपूर्वीच कौस्तुभ गावडे यांच्या आईचे निधन झाले होते. या यशाच्या क्षणी आईची आठवण काढताना मयुरी गावडे भावुक झाल्या. “आज कौस्तुभ आमदार झाल्याचे पाहण्यासाठी आई हव्या होत्या,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढा देण्याचे आश्वासन देत कौस्तुभ गावडे यांनी आगामी काळात आपल्या कामातून विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील या निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती