सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेगाड्यांची भीषण धडक; ४६ जणांचा मृत्यू, १७९ प्रवासी जखमी
  • अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
  • केंद्रीय कर्मचार्‍यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ, मोदी सरकारकडून 10,016 कोटी मंजूर
  • उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
 विश्लेषण

स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेगाड्यांची भीषण धडक; ४६ जणांचा मृत्यू, १७९ प्रवासी जखमी

डिजिटल पुणे    28-10-2026 17:35:01

माद्रिद : स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेगाड्यांची धडक होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला असून, १७९ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य स्पेनमधील टोलेडो प्रांतात माद्रिद ते सेव्हिल या रेल्वेमार्गावर बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रेन्फे आणि इर्यो या रेल्वे कंपन्यांच्या दोन हायस्पीड गाड्यांची एकमेकांना धडक बसली. या दोन्ही गाड्यांमध्ये मिळून सुमारे ५४४ प्रवासी प्रवास करत होते. रेन्फेच्या गाडीत ३९७, तर इर्योच्या गाडीत १४७ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

धडकेनंतर डबे रुळांवरून घसरले

दोन गाड्यांमध्ये झालेल्या जोरदार धडकेमुळे काही डबे रुळांवरून घसरले, तर काही डबे उतारावर कोसळल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत रेल्वेच्या डब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही प्रवासी डब्यांमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर अपघाताची दृश्ये समोर आली असून, त्यामध्ये रेल्वेच्या डब्यांची झालेली दुरवस्था आणि परिसरात विखुरलेले अवशेष दिसत आहेत.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात येत आहे. गंभीर जखमींना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

रेल्वे वाहतूक स्थगित

या दुर्घटनेनंतर माद्रिदला दक्षिणेकडील आंदालुसिया प्रदेशाशी जोडणाऱ्या उच्चगती रेल्वेमार्गावरील वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. रेल्वे परिचालक कंपनी अडिफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात माहिती दिली. अपघातामुळे या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून, प्रवाशांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांच्याकडून दुःख व्यक्त

स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी या भीषण दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख आणि धक्का व्यक्त केला आहे. त्यांनी परिवहन मंत्री तसेच कास्टिला-ला मंचा प्रांताच्या अध्यक्षांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा कार्यरत असून, पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

या भीषण रेल्वे दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील संभाव्य बिघाड आणि रेल्वे परिचालनासंदर्भातील बाबींची चर्चा स्थानिक माध्यमांमध्ये होत असली, तरी अपघाताचे अधिकृत कारण निश्चित झालेले नाही. संबंधित अधिकारी दुर्घटनेचा तपास करत असून, मृत आणि जखमींच्या संख्येबाबत अधिकृत माहिती अद्ययावत केली जात आहे.या दुर्घटनेमुळे स्पेनमधील हायस्पीड रेल्वेसेवेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अपघाताच्या कारणांचा सविस्तर तपास केला जाणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती