पुणे : आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. वडगाव बुद्रूक परिसरातील ‘सोहम आयुर्वेदिक उपचार केंद्र’ या मसाज पार्लरवर नऱ्हे पोलिसांनी छापा टाकून पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी पार्लर चालवणाऱ्या पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ असलेल्या निवासी इमारतीत मंगळवारी (२७ ऑक्टोबर) रात्री सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. महादेवी विकास चौगुले (वय ४२) आणि विकास शंकर चौगुले (वय ५०, दोघेही रा. शिवाजीनगर गावठाण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार स्वप्नील सूर्यवंशी यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून केली कारवाई
पोलिसांना संबंधित मसाज पार्लरमध्ये आयुर्वेदिक उपचारांच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर केंद्रावर छापा टाकून तेथील महिलांची सुटका करण्यात आली.
पैशांचे आमिष दाखवून महिलांना प्रवृत्त केल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पती-पत्नी महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप आहे. निवासी परिसरातील सदनिकेत हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर आरोपी आपला उदरनिर्वाह करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.या कारवाईनंतर दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास नऱ्हे पोलीस करत आहेत.