पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील चापेकर चौक परिसरात मध्यरात्री आगीची मोठी दुर्घटना घडली. कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १७ दुचाकी आणि ४ चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीच्या घटनेत एक पुरुष जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, तसेच इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली.
रात्री १ वाजून ५९ मिनिटांनी अग्निशमन दलाला कॉल
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये अचानक आग भडकली आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. पार्किंगमधील वाहनांनी एकामागोमाग पेट घेतल्याने परिसरात धावपळ उडाली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.या घटनेची माहिती मुख्य अग्निशमन केंद्राला रात्री १ वाजून ५९ मिनिटांनी मिळाली. त्यानंतर प्राधिकरण आणि थेरगाव उपअग्निशमन केंद्रातील अग्निशमन वाहने व जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
जवानांची धावपळ; इमारतीतील नागरिकांची सुखरूप सुटका
घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले. पाण्याच्या माऱ्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही नागरिक अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली.अग्निशमन दलाच्या पथकाने अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली. जवानांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
१७ दुचाकी आणि ४ चारचाकी वाहनांचे नुकसान
या दुर्घटनेबाबत माहिती देताना फायरमन विवेक पाटील यांनी सांगितले की, घटनास्थळी पोहोचल्यानंतर पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींसह चारचाकी वाहनांना आग लागल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाच्या पथकाने होज रीलच्या मदतीने पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे विझवली. तसेच वरच्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.या आगीत एकूण १७ दुचाकी आणि ४ चारचाकी वाहने जळून खाक झाली. याशिवाय एक पुरुष जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
दरम्यान, कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रिक वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.या घटनेचा पुढील तपास पोलीस आणि अग्निशमन दलाकडून केला जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेमुळे चापेकर चौक परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.