मुंबई : महात्मा फुले यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा वारसा जपणे आवश्यक आहे. महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त पुण्यातील फुलेवाडा आणि भिडेवाडा येथील सुशोभिकरण आणि विकासाच्या कामांना गती देवून त्वरित ते पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे मनपाला दिले.मंत्रालयात आयोजित ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत उपसमितीचे सदस्य तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे (ऑनलाईन), सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, ओबीसी विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज, पुणे मनपाचे आयुक्त नवलकिशोर राम आदी उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त पुण्यातील ऐतिहासिक फुलेवाडा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रस्तावाबाबत बैठकीत चर्चा झाली.
राज्यात १५ जिल्ह्यात नाममात्र दराने वसतीगृहाला जागा
महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याकरिता १२ ठिकाणी जागा निश्चित झाली आहे. १५ ठिकाणी नाममात्र एक रुपया दराने जागा उपलब्ध करून देण्याची योजना तयार करावी. सर्व जिल्ह्यात वसतीगृहासाठी जागा निश्चिती १५ दिवसात पूर्ण करावी. मुंबई शहरातही जागा उपलब्ध करून घेण्यास प्राधान्य द्यावे. प्रत्येक वसतिगृहात ५०० विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था होईल, अशा स्वरूपाचा आराखडा तयार करावा.
महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दुष्काळ निवारणासाठी कार्यरत असलेल्या संबंधित आठ विभागांनी महात्मा फुले यांच्या नावाने योजना तयार करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
ओबीसींचा अनुशेष दूर करण्यासाठी कार्यवाही
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी मंजूर असलेल्या २७ टक्के आरक्षणाच्या अनुषंगाने विविध विभागांतील रिक्त पदे आणि भरतीमधील अनुशेषाचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित विभागांनी रिक्त पदांची माहिती आणि अनुशेषाचा तपशील सादर करावा, तसेच हा अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.
भटक्या-विमुक्तांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा अभ्यास
भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून त्यांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने शिंदे समितीच्या धर्तीवर स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून समितीच्या स्वरूपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या अभ्यासातून ओबीसी समाजाचा सर्वंकष माहिती-संच तयार करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना आखण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत भटक्या-विमुक्त घटकांना घरबांधणीसाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच समाजमंदिर उभारणीसाठी आवश्यक अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्याच्या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. ओबीसी तसेच भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर सर्वसमावेशक चर्चा करून शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी आवश्यक निर्णय घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून या समाजघटकांना न्याय देण्यासाठी सातत्याने कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
भटक्या-विमुक्तांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष
भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या विकासासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष असावे, व्हीजेएनटीसोबत ओबीसी, एसबीसीसाठी आधार योजनेतील भत्त्यात वाढ करावी, अशी सूचना मंत्री सावे यांनी बैठकीत केली. सध्या ओबीसींच्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षात भटक्या-विमुक्त जाती-जमातींचा समावेश असल्याने या घटकांसाठीच्या निधीचे स्वतंत्र लेखाशीर्ष करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ओबीसी आणि भटक्या-विमुक्त जाती-जमातींसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष तयार करण्याच्या निर्णयानुसार, आगामी डिसेंबर महिन्यात भटक्या-विमुक्त घटकांसाठी स्वतंत्र निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात येणार आहे, असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
कलिना येथे फुले, शाहू, आंबेडकर इंटरनॅशनल ग्रंथालय पूर्ण झाले आहे, याच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री यांना निमंत्रित करावे. राज्यातील सर्व विद्यापीठात महात्मा फुले अध्यासन केंद्र स्थापन करावे, पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमात महात्मा फुलेंच्या साहित्याचा समावेश व्हावा, शिष्यवृत्ती किंवा फेलोशिप महात्मा फुले यांच्या नावाने सुरू करावी, महिला सक्षमीकरणासाठी विशेष महिला योजना सुरू करण्याबाबत बैठकीत मंत्री भुजबळ यांनी सूचना केल्या.