सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
  • बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक संजय गुप्ता बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
 विश्लेषण

बॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन; बाथरूममध्ये पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत

डिजिटल पुणे    31-10-2026 12:38:01

मुंबई : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय गुप्ता यांचे वयाच्या ५७व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. 'कांटे', 'शूटआउट ॲट वडाळा' आणि 'काबिल' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबरच्या रात्री संजय गुप्ता यांचा अपघाती मृत्यू झाला. ते घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, ही घटना रात्री घडूनही शनिवारी सकाळपर्यंत कोणाच्याही लक्षात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.

अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर दिली निधनाची माहिती

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संजय गुप्ता यांच्या निधनाची बातमी दिली. या पोस्टमध्ये त्यांनी संजय गुप्ता यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देत तीव्र दुःख व्यक्त केले.

संजय गुप्ता हे उत्तम कथाकार, उत्साही व्यक्तिमत्त्व आणि चित्रपटांवर मनापासून प्रेम करणारे दिग्दर्शक होते. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची भावना अशोक पंडित यांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि जवळच्या व्यक्तींप्रती संवेदनाही व्यक्त केल्या. त्यांच्या अंत्यसंस्कारासंदर्भातील माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'आतिश' चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

संजय गुप्ता यांनी १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आतिश : फील द फायर' या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य पांचोली यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. पहिल्याच चित्रपटापासून त्यांनी आपल्या वेगळ्या दिग्दर्शनशैलीची छाप पाडली.

२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांटे' या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर आणि लकी अली यांसारख्या कलाकारांची या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका होती. ॲक्शन, गुन्हेगारी विश्व आणि वेगळ्या कथानकामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

अंडरवर्ल्ड आणि ॲक्शनपट ही ठरली खास ओळख

संजय गुप्ता यांच्या चित्रपटांमध्ये मुंबईतील अंडरवर्ल्ड, गँगस्टर आणि गुन्हेगारी विश्वाचे चित्रण ठळकपणे पाहायला मिळत असे. 'शूटआउट ॲट लोखंडवाला', 'शूटआउट ॲट वडाळा', 'मुसाफिर', 'जिंदा', 'काबिल', 'मुंबई सागा', 'जज्बा', 'प्लॅन', 'ॲसिड फॅक्टरी', 'दस कहानियां' आणि 'खौफ' यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.त्यांच्या चित्रपटांची मांडणी, ॲक्शन दृश्ये आणि कथाकथनाची वेगळी पद्धत यामुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.

यापूर्वीही कारचा झाला होता भीषण अपघात

काही वर्षांपूर्वी पुण्याहून मुंबईला परतत असताना संजय गुप्ता यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. त्यावेळी ते स्वतः कार चालवत होते. मात्र, या अपघातातून ते सुखरूप बचावले होते. आता त्यांच्या अचानक निधनाची बातमी समोर आल्याने चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.बॉलिवूडमधील ॲक्शन आणि गँगस्टरपटांना वेगळी ओळख देणाऱ्या संजय गुप्ता यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान दिग्दर्शक गमावला आहे.


 Give Feedback



 जाहिराती