सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
  • बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक संजय गुप्ता बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
 जिल्हा

जुन्नरमध्ये बनावट विदेशी मद्याचे रॅकेट उद्ध्वस्त! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल 11.55 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

गजानन मेनकुदळे    31-10-2026 14:07:09

पुणे : जुन्नर तालुक्यात बनावट विदेशी मद्याची विक्री करण्यासाठी साठवणूक केल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नारायणगाव पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत बनावट मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 11 लाख 55 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी कारवाई कशी झाली?

राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव विभागाच्या पथकाला गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावातील बंगारवाडी वस्ती येथे बनावट विदेशी मद्याची विक्री करण्यासाठी साठवणूक केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 30 ऑक्टोबर 2026 रोजी पथकाने छापा टाकून मद्यसाठा जप्त केला.

या कारवाईत रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिलीच्या एकूण 96 सीलबंद बाटल्या, ज्यांची किंमत 24 हजार रुपये आहे, तसेच देशी दारू जीएम संत्रा मद्याच्या 180 मिलीच्या एकूण 5,040 सीलबंद बाटल्या, ज्यांची किंमत 4 लाख 3 हजार 200 रुपये आहे, असा एकूण 4 लाख 27 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अळकुटी येथेही मोठी कारवाई

दरम्यान, अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथेही मद्यसाठा असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकून मोठ्या प्रमाणात मद्य जप्त केले.

या कारवाईत रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 1,392 सीलबंद बाटल्या, ज्यांची किंमत 3 लाख 48 हजार रुपये आहे, तसेच इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 1,728 सीलबंद बाटल्या, ज्यांची किंमत 3 लाख 80 हजार 160 रुपये आहे, असा एकूण 7 लाख 28 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अशा प्रकारे दोन्ही कारवायांमध्ये एकूण 11 लाख 55 हजार 360 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

कारवाईत तिघांना अटक

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने खालील तीन आरोपींना अटक केली आहे.

1. सचिन गणपत गाडे (वय 40 वर्षे) – रा. निमगाव सावा, ता. जुन्नर, जि. पुणे.

2. ताहिर युसुफ शेख (वय 43 वर्षे) – सध्या रा. निमगाव सावा, ता. जुन्नर, जि. पुणे.

3. सागर रामदास बोऱ्हाडे (वय 27 वर्षे) – रा. गावठाण, अळकुटी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक रविकिरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तसेच राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक, उपअधीक्षक आणि शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सौरभ आवटे, समृद्धी निकम, तसेच जवान गणेश वाळकुळ, निलेश केदार, दिलीप केकरे, प्रियंका झांजरे आणि वाहनचालक सुनील कोकणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

पुढील तपास सुरू

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव-2 चे निरीक्षक शरद जाधव करीत आहेत. बनावट मद्याची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यामागे आणखी कोणाचे संबंध आहेत का, याचा तपास विभागाकडून केला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती