मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, या चित्रपटात चर्चेतील राजकीय आणि प्रमुख व्यक्तींच्या भूमिका कोण साकारणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता अखेर अशोक खरातची भूमिका कोणता अभिनेता साकारणार, याचा खुलासा निर्मात्यांनी केला आहे.
अशोक खरातच्या भूमिकेत मनोज जोशी
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' या चित्रपटात वादग्रस्त भोंदूबाब अशोक खरातची भूमिका ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी साकारणार आहेत. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मनोज जोशी यांच्या नावाची घोषणा होताच या चित्रपटाची चर्चा आणखी रंगू लागली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील त्यांची देहबोली आणि लूक पाहून अनेक नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय आहे अशोक खरात प्रकरण?
नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही राजकीय व्यक्तींशी संबंधित छायाचित्रे समोर आल्याने राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली होती. या प्रकरणात अशोक खरातला अटक करण्यात आली असून, प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
दीपाली सय्यद आणि सुबोध भावेही महत्त्वाच्या भूमिकेत
या चित्रपटातील इतर कलाकारांची नावेही हळूहळू समोर येत आहेत. अभिनेत्री दीपाली सय्यद या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. त्यांची भूमिका रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणे बाकी आहे. याशिवाय लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे हेदेखील चित्रपटात दिसणार असून, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे.
20 नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरमधून कलाकारांची ओळख समोर येत असल्याने 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'बाबतची उत्सुकता वाढली आहे. अशोक खरात प्रकरणातील घटनांवर आधारित हा चित्रपट नेमकं काय दाखवणार, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.