सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
  • 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
  • बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक संजय गुप्ता बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
 जिल्हा

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

डिजिटल पुणे    31-10-2026 17:02:05

त्र्यंबकेश्वर : पवित्र कुशावर्त तीर्थ, गोदावरीच्या सान्निध्यात, मंत्रोच्चार, शंखनाद आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे आज सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचा मंगलमय सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण करून सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ झाला.मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सकाळी कुशावर्त तीर्थ येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते उपस्थित साधू-महंतांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.

सोहळ्याच्या प्रारंभी पवित्र गोदावरीचे विधिवत पूजन करण्यात आले. पुरोहितवृंदांनी मंत्रोच्चारांतून गोदावरीचे स्तवन केले. त्यानंतर संकल्पविधी करण्यात आला. सर्व प्राणिमात्रांना सुख, शांती, समृद्धी आणि कल्याण लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली.गणेशपूजनाने पूजाविधीचा प्रारंभ झाला. सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्व धार्मिक विधी आणि आयोजन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी श्रीगणेशाला आवाहन करण्यात आले. पुरोहितवृंदांनी मंत्रोच्चारांतून देवतांचे आवाहन केले. त्यानंतर ध्वजारोहणासाठी देवतांची अनुज्ञा मागण्यात आली. गोदावरी गंगा प्रार्थना आणि सामूहिक प्रार्थनेने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

या सोहळ्यास आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक डॉ. एस. स्वामी, उपविभागीय अधिकारी पवनदत्ता, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, अमोल चौधरी यांच्यासह विविध संत महंत उपस्थित होते.

ध्वजस्तंभ व धर्मध्वजाचे विधिवत पूजन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धर्मध्वज आणि ध्वजपताकेचे विधिवत पूजन झाले. जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांनीही धर्मध्वजाचे पूजन केले.

सिंहस्थ पर्वाचा प्रारंभ

बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश हा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ज्योतिषीय परंपरेतील महत्त्वाचा योग मानला जातो. या पार्श्वभूमीवर धर्मध्वजारोहणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. धर्मध्वजारोहण करून सिंहस्थ पर्वाचा प्रारंभ होतो. धर्मध्वज हा सिंहस्थाच्या पौराणिक परंपरेचे, गोदावरीच्या पावित्र्याचे आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक मानला जातो.

सिंहस्थ धर्मध्वजावरील शुभचिन्हांना विशेष महत्त्व

सिंहस्थ धर्मध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, मगर, ॐकार, स्वस्तिक, घंटा आदी धार्मिक आणि ज्योतिषीय प्रतीकांचा समावेश आहे. या प्रत्येक प्रतीकामागे धार्मिक श्रद्धा आणि पौराणिक संदर्भ आहेत.सूर्य आणि चंद्र ही प्रतीके अमृतकुंभाच्या रक्षणाशी संबंधित मानली जातात. बृहस्पती आणि सिंह ही प्रतीके सिंहस्थाच्या ज्योतिषीय कालगणनेशी जोडलेली आहेत. मगर हे गोदावरीच्या तीर्थपरंपरेचे प्रतीक आहे. ॐकार आणि स्वस्तिक ही चिन्हे आध्यात्मिकता, मांगल्य आणि कल्याणाचा संदेश देतात. धर्मध्वजावरील बारा घंटा, दहा दिशा आणि ‘ह्रीं’ हे बीजाक्षर यांनाही विशेष धार्मिक व प्रतीकात्मक महत्त्व आहे.अशा विविध प्रतीकांनी युक्त धर्मध्वज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्राचीन परंपरेचे आणि त्र्यंबकेश्वरच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडवितो.

शंखनाद, मंत्रोच्चार आणि जयघोषात धर्मध्वजारोहण

धर्मध्वज पूजनानंतर शंखनाद करून ध्वजाची आरती करण्यात आली. त्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मध्वजाची प्रदक्षिणा केली. यावेळी भगवान त्र्यंबकेश्वराची प्रार्थना करण्यात आली.पुरोहितवृंदांच्या मंत्रोच्चारांत, शंखनाद आणि धार्मिक जयघोषात धर्मध्वजारोहणाचा सोहळा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. उपस्थित साधू-महंत आणि भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा अनुभव घेतला.धर्मध्वजारोहणानंतर पवित्र गोदावरीची आरती करण्यात आली. त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेत विशेष स्थान असलेल्या या धर्मध्वजारोहण सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविले.


 Give Feedback



 जाहिराती