सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
  • 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
  • बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक संजय गुप्ता बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
 जिल्हा

'हायकोर्टात गेलात तरी कारवाई थांबणार नाही!' तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना कडक इशारा

डिजिटल पुणे    31-10-2026 17:24:51

मुंबई : पान मसाल्याच्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून, संबंधित सेलिब्रिटींनी उच्च न्यायालयात धाव घेतली तरी कायदेशीर कारवाई थांबणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पान मसाल्याच्या जाहिराती केल्याप्रकरणी FDA कडून अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसांना तिन्ही कलाकारांनी उत्तर दिले असून, प्रशासनाकडे काही मुदतीची मागणीही केली होती. मात्र, याचदरम्यान अजय देवगणने FDA च्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ही नोटीस मनमानी पद्धतीने बजावण्यात आल्याचा दावा त्याने याचिकेत केला आहे. या याचिकेवर येत्या 4 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

या संपूर्ण प्रकरणावर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी FDA ची भूमिका स्पष्ट केली. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असली, तरी न्यायालयाकडून FDA च्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही प्रशासनाकडून नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई अधिक वेगाने पुढे नेण्यात येईल, असे मुंढे यांनी सांगितले.

दंडात्मक कारवाईचा निर्णय लवकरच

तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व कायदेशीर सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. संबंधित सहाय्यक आयुक्तांनी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून प्रकरण बंद केले आहे. आता पुढील निर्णय आणि संभाव्य दंडात्मक कारवाईसाठी हे प्रकरण सहआयुक्तांकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच यासंदर्भात पुढील आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

सेलिब्रिटी असोत किंवा व्यावसायिक, कायद्यापुढे सर्व समान!

पत्रकार परिषदेत बोलताना मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एखादी व्यक्ती मोठी सेलिब्रिटी असली किंवा व्यावसायिक असली, तरी नियमांचे उल्लंघन केल्यास कोणालाही विशेष सवलत दिली जाणार नाही. कायद्याच्या दृष्टीने संबंधित व्यक्ती केवळ जाहिरातदार असून, जनतेच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही घटकाला पाठीशी घातले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, राज्यातील अन्न सुरक्षा कायद्यांची अंमलबजावणी अधिक कठोर आणि पारदर्शक करण्यासाठी FDA कडून 15 महत्त्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे पान मसाला जाहिरात प्रकरणात प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार आणि अजय देवगणच्या याचिकेवर उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती