मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि ‘भारत पर्व २०२६’ च्या निमित्ताने आयोजित उपक्रमात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राचे विशेष पर्यटन दालन उभारण्यात आले आहे. या दालनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक हातमागावरील देखण्या पैठणी साड्यांची पाहणी केली. पैठणी विणकामामागील कलाकुसर, पारंपरिक तंत्र, त्यातील बारकावे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची त्यांनी माहिती जाणून घेतली. या माध्यमातून महाराष्ट्राच्या पारंपरिक कला, हस्तकला, सांस्कृतिक वारसा आणि कारागिरांच्या कौशल्याचे दर्शन त्यांना घडले. पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव आणि त्यांच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व २०२६ च्या निमित्ताने गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या उपक्रमात महाराष्ट्र पर्यटन विभाग सहभागी होत आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या विशेष दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे, समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेचे दर्शन देशभरातील पर्यटकांना घडविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय उपसंचालक विजय जाधव उपस्थित आहेत. दालनात महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहिती देणारी माहितीपत्रके आणि पर्यटनविषयक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच पैठणी विणकामाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेच्या विविध वस्तू ही दालनाची प्रमुख आकर्षणे आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम), दादर येथील किचन स्टुडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचेही सादरीकरण करण्यात येत आहे. याशिवाय, महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य पर्यटनस्थळे, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन आणि सांस्कृतिक परंपरा यांची माहिती या दालनाच्या माध्यमातून पर्यटकांना देण्यात येत आहे. पैठणीसारखी पारंपरिक वस्त्रकला, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळण्यासोबतच राज्यातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक कलाकार, कारागीर आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे.
पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव म्हणाले, “राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख करून देणे, परस्पर संवाद वाढविणे आणि विविधतेतील एकतेची भावना अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक ओळखीचा, ऐतिहासिक वारशाचा, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपरंपरेचा आणि पर्यटन क्षेत्रातील विविध संधींचा देशभरातील पर्यटकांसमोर प्रभावीपणे परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट देऊन राज्याच्या समृद्ध कला, संस्कृती आणि पारंपरिक पैठणी विणकामाची माहिती जाणून घेतली, याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांची ही भेट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला आणि पर्यटनवैविध्याला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक प्रसिद्धी मिळवून देणारी ठरेल.”
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे म्हणाले, “महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर एक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी राज्यातील पर्यटनवैविध्याची देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी मांडणी करणे आवश्यक आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र पर्यटन विभाग विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर राज्याचे पर्यटनवैभव प्रभावीपणे सादर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे आयोजित या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक परंपरा व्यापक स्तरावर पोहोचविण्याची संधी मिळत आहे.
महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट दिल्याबद्दल आणि राज्याच्या सांस्कृतिक वारशाची दखल घेतल्याबद्दल आम्ही पंतप्रधान यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक प्रसिद्धी मिळण्यासोबतच राज्यातील पर्यटनस्थळांकडे देशभरातील पर्यटकांचे लक्ष वेधले जाण्यास आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.”