सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! ‘नोकरीच्या शोधात आहे’ म्हणताच कोर्टाने सुनावले खडेबोल; देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती कायम
  • महाराष्ट्रातील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी! पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टासह अनेक जिल्हा न्यायालये रिकामी; पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर
  • शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौरा रद्द
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 विश्लेषण

पुणेकरांनो सावधान! नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर वाढला; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये पहाटेपासून मुसळधार सरी, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत

डिजिटल पुणे    02-11-2026 10:59:15

पुणे : ऑक्टोबर महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवसापासून पुणेकरांना पुन्हा पावसाचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रविवार रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून सोमवारी पहाटे पावसाचा जोर आणखी वाढला. सकाळी साडेसहाच्या सुमारास शहरातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

पुण्यातील कोथरूड, आंबेगाव, सिंहगड रस्ता, औंध, बाणेर, बावधन, वारजे आणि पाषाण परिसरात पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. तर पिंपरी-चिंचवडमधील सांगवी, जगताप डेअरी, डांगे चौक आणि हिंजवडी परिसरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. धायरी, सुसगाव आणि नांदेड सिटी परिसरातही पावसाची नोंद झाली आहे.

अचानक वाढलेल्या पावसामुळे सकाळच्या वेळेत रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे संपूर्ण शहरात एकाच वेळी पावसाचा जोर नव्हता. काही भागांत मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मेट्रोच्या उद्घाटनापूर्वीच स्टेशनमध्ये पाणी गळती

दरम्यान, पुण्यातील बहुप्रतीक्षित शिवाजीनगर ते मान-हिंजवडी मेट्रो मार्गाच्या उद्घाटनापूर्वीच नव्या मेट्रो स्टेशनमधील त्रुटी समोर आली आहे. येत्या ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो मार्गाचे लोकार्पण होणार आहे. मात्र, उद्घाटनाला काही दिवस शिल्लक असतानाच मान मेट्रो स्टेशनच्या परिसरात पावसाचे पाणी गळत असल्याचे निदर्शनास आले आहे.

नव्या मेट्रो स्टेशनमध्येच पाणी झिरपत असल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उद्घाटनापूर्वीच अशी बाब समोर आल्याने पीएमआरडीएच्या नियोजनावर आणि संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर चर्चा सुरू झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये कमी पाऊस, नोव्हेंबरमध्ये जोरदार हजेरी

विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पुण्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. भारतीय हवामान विभागाच्या शिवाजीनगर केंद्रात संपूर्ण महिन्यात केवळ १.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच शहरात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा राज्याच्या हवामानावर परिणाम

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामानात बदल झाला आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भासह राज्यातील विविध भागांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एकीकडे हिवाळ्याची चाहूल लागलेली असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने पुणेकरांना बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. पुढील काही काळ पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती