सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! ‘नोकरीच्या शोधात आहे’ म्हणताच कोर्टाने सुनावले खडेबोल; देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती कायम
  • महाराष्ट्रातील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी! पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टासह अनेक जिल्हा न्यायालये रिकामी; पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर
  • शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौरा रद्द
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 जिल्हा

सोनखेडच्या गोरगरीब रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार द्या ! आरोग्यमंंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी दरम्यान निर्देश

डिजिटल पुणे    02-11-2026 13:32:47

नांदेड : सोनखेड (ता. लोहा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना स्थानिक पातळीवरच वेळेवर, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात. किरकोळ तसेच उपचारयोग्य आजारांसाठी रुग्णांना अन्यत्र पाठविण्याचे प्रमाण कमी करावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य संवाद यात्रेदरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन उपलब्ध आरोग्य सुविधा, प्रसूती सेवा आणि नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाधिक प्रसूती होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. गर्भवती मातांना आवश्यक तपासण्या, समुपदेशन आणि उपचार वेळेत उपलब्ध करून द्यावेत. तसेच डीटी, टीटी आणि रेबीज प्रतिबंधक लसींसह सर्व जीवनावश्यक औषधांचा पुरेसा साठा कायम उपलब्ध ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवांची माहिती गावागावांत पोहोचवून जनजागृती करावी, अशा सूचनाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा व गुणवत्तेचा आढावा घेतला. बांधकामाचा दर्जा उत्तम राखावा तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या व सुधारणा वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. नागरिकांशी थेट संवाद साधून आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या.

आरोग्य संवाद यात्रेदरम्यान आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोनखेड येथील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. स्थानिक आरोग्य सुविधांबाबतच्या त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. नागरिकांना आरोग्य सेवा मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शासनाच्या आरोग्य सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी दिलासा देणे आणि प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे आरोग्य विभागाचे प्राधान्य असले पाहिजे, असेही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्य सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच स्थानिक पातळीवरील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी आमदार आनंद तिडके-बोंढारकर, संचालक शहरी आरोग्य सेवा डॉ.गोविंद चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, क्षयरोग अधिकारी डॉ. मिरदुडे  व इतर जिल्हास्तरीय अधिकारी हजर होते. तसेच तालुका आरोग्य अधिकारी,  वैद्यकीय अधिकारी, इन्चार्ज  सिस्टर, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती