पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व व चित्रकला आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये १७ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्योजक रणजित रामदास काकडे यांच्या वतीने या सर्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा तळेगाव दाभाडे येथे दि.१ नोव्हेंबर २०२६ रोजी झाला.
'सक्षम, सर्जनशील आणि आत्मविश्वासू विद्यार्थी हाच विकसित भारताचा पाया आहे. 'विकसित भारत २०४७' चे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विचारांना व्यासपीठ, कल्पनांना वाव आणि गुणवत्तेला प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.या स्पर्धा विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीत प्रेरणा देत राहतील',असे उद्गार रणजित काकडे यांनी यावेळी बोलताना काढले.यावेळी माजी मंत्री बाळासाहेब भेगडे,रवी भेगडे,गणेश भेगडे,नगराध्यक्ष संतोष दाभाडे,नगरसेवक इंद्रजित ओसवाल, रविंन्द्रनाथ दाभाडे,माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,शांताराम कदम,गुलाबराव म्हाळसकर,विनायक भेगडे, सौ. पोटे,भाजपाचे सर्व पदाधिकारी, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
'माझा भारत माझा अभिमान' या संकल्पनेवर आधारित वकृत्व, निबंध लेखन आणि चित्रकला अशा तीन स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये या स्पर्धा झाल्या. 'माझा भारत देश', 'विकसित भारत घडविण्यात विद्यार्थ्यांची भूमिका', 'विकसित भारत २०४७' आणि 'आत्मनिर्भर भारत' यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.या स्पर्धांना तालुक्यातील शाळांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ मेडल आणि सहभागी विद्यार्थी व शाळांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच सर्व विजयी स्पर्धकांमधून लकी ड्रॉ पद्धतीने टॅब, लॅपटॉप, स्मार्ट वॉच यासारखी आकर्षक बक्षिसे काढण्यात आली.