सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! ‘नोकरीच्या शोधात आहे’ म्हणताच कोर्टाने सुनावले खडेबोल; देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती कायम
  • महाराष्ट्रातील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी! पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टासह अनेक जिल्हा न्यायालये रिकामी; पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर
  • शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौरा रद्द
  • पुण्याला पावसाने झोडपलं; बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
  • राज्यात दुष्काळाच्या संकटात वरुणराजाची एन्ट्री! पुणे, बारामती, इंदापुरात काल रात्रीपासून अवकाळी पावसाचा हाहाकार
 जिल्हा

महाराष्ट्रात ‘कोरोना व्हायरस’सारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसचा फैलाव! सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘सह्याद्री वाचवा’साठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

डिजिटल पुणे    02-11-2026 18:54:56

नागपूर : महाराष्ट्रात सध्या कोरोना व्हायरससारखाच ‘झाडखाऊ’ व्हायरस पसरला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कर्जत तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्पासाठी तब्बल ३२ हजार झाडे तोडली जाणार असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. तसेच सह्याद्रीच्या संरक्षणासाठी नागपुरातून राज्यव्यापी ‘सह्याद्री वाचवा’ आंदोलनाची घोषणा केली.

कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे शिंदे यांनी म्हटले. विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल का केली जात आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. वीजनिर्मिती महत्त्वाची असली, तरी त्यासाठी निसर्गाचा बळी देणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

'वीजेसाठी माणसाला विस्थापित करा, झाडांना नाही!'

वीज ही माणसाची गरज असली तरी तिच्या निर्मितीसाठी ३२ हजार झाडे तोडण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न सयाजी शिंदे यांनी उपस्थित केला. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू याच्या अधिवासालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. सरकारने एकही झाड तोडले जाणार नाही, अशी स्पष्ट घोषणा करेपर्यंत आपला विरोध आणि आंदोलन सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा अभिमान आणि सह्याद्रीच्या विनाशाकडे दुर्लक्ष?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा गौरव करायचा, त्यांच्या गड-किल्ल्यांचे महत्त्व सांगायचे आणि दुसरीकडे त्याच सह्याद्रीतील वृक्षसंपदा नष्ट होऊ द्यायची, हा दुटप्पीपणा असल्याची टीका शिंदे यांनी केली. या आंदोलनात केवळ पर्यावरणप्रेमींनीच नव्हे, तर राज्यातील कलाकार, वकील, डॉक्टर, खेळाडू, शेतकरी संघटना आणि महिला बचत गटांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

वृक्षारोपणाच्या नावाखाली नेमकी किती झाडे जगली?

सरकारकडून वृक्षारोपणाच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात लावलेली किती झाडे जगली, याची माहिती प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी मिळवावी, असे आवाहनही सयाजी शिंदे यांनी केले. वृक्षारोपणाच्या नावाखाली होणारा कथित गैरव्यवहार जनतेसमोर आणण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.

‘सह्याद्री वाचवा’ हे आंदोलन एका भागापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात उभे राहिले पाहिजे. नागरिकांनी घराबाहेर पडून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन करत दिवाळीच्या उत्सवापेक्षाही सह्याद्रीच्या रक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पावरून राज्यातील पर्यावरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती