नांदेड : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत किंवा कमीत कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी खासगी रुग्णालये व वैद्यकीय संघटनांनी शासनाला सहकार्य करावे. डॉक्टरांनी मांडलेल्या अडचणी व सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
राज्य शासनाच्या वतीने दि. 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य जनसंवाद यात्रे’चा प्रारंभ नांदेड जिल्ह्यातून करण्यात आला. या यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबूराव कदम कोहळीकर, आमदार आनंद तिडके-बोंढारकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, आरोग्य सेवेचे संचालक (शहरी) डॉ. गोविंद चौधरी, संचालक (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. सतीशकुमार सोळंके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय नवले यांच्यासह जिल्ह्यातील खासगी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य आवश्यक
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, यासाठी खासगी रुग्णालये व वैद्यकीय संघटनांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र रुग्णांना उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी केले.
खासगी रुग्णालयांशी संबंधित दरनिश्चिती, विविध परवानग्या आणि नूतनीकरण प्रक्रियेतील अडचणी यांसारख्या विषयांवरही त्यांनी चर्चा केली. अग्निसुरक्षा आणि प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित परवानग्यांच्या नूतनीकरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना आवश्यक असलेली माहिती संबंधित रुग्णालयांनी वेळेत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शासन आणि खासगी वैद्यकीय क्षेत्र यांच्यात सातत्यपूर्ण संवाद राहिल्यास आरोग्यसेवेतील अडचणी दूर करणे शक्य होईल. डॉक्टरांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येतील, असेही आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी स्पष्ट केले.
डॉक्टरांच्या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन
या बैठकीदरम्यान खासगी डॉक्टरांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे, प्रलंबित देयके, संबंधित संकेतस्थळावरील अडचणी, तसेच आकस्मिक घटनांनंतर केली जाणारी कायदेशीर कार्यवाही या विषयांकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. आकस्मिक घटना घडल्यानंतर वस्तुस्थितीची योग्य शहानिशा करूनच पुढील कार्यवाही करावी. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, अशा सूचनाही डॉक्टरांनी मांडल्या.
या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. खासगी डॉक्टरांना कामकाज करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन नियमांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
संवादातून आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यावर भर
सध्या राज्यातील काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी त्यांना मोफत किंवा परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खासगी वैद्यकीय क्षेत्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.
आरोग्य जनसंवाद यात्रेच्या आयोजनामागील भूमिका आरोग्य सेवेचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केली. शासन आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध घटकांमध्ये थेट संवाद साधून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे, नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आणि आरोग्यविषयक अडचणींचे निराकरण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले.